५५ वर्षांपूर्वीचं ‘अंजू उडाली भुर्र’ बालनाट्य पुन्हा रंगभूमीवर, 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेची मुख्य भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:59 IST2025-03-25T16:58:59+5:302025-03-25T16:59:19+5:30
‘अंजू उडाली भुर्र’ हे गाजलेलं बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. या बालनाट्यातून अंकुर वाढवे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

५५ वर्षांपूर्वीचं ‘अंजू उडाली भुर्र’ बालनाट्य पुन्हा रंगभूमीवर, 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेची मुख्य भूमिका
'चला हवा येऊ द्या'ने अनेक नवोदित कलाकारांना प्रसिद्धीझोतात आणलं. सागर कारंडे, कुशल बद्रिके, स्नेहल शिदम या कलाकारांसोबत अंकुर वाढवेदेखील घराघरात पोहोचला. उत्तम अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना हसवणाऱ्या अंकुरला 'चला हवा येऊ द्या' या शोने लोकप्रियता मिळवून दिली. प्रेक्षकांना आवडे तो अंकुर वाढवे आता बालनाट्यातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
‘अंजू उडाली भुर्र’ हे गाजलेलं बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. या बालनाट्यातून अंकुर वाढवे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या बालनाट्याचं दिग्दर्शन केलं आहे. तर नरेंद्र बल्लाळ यांचं लेखन आहे. अशोक पावसकर आणि चित्रा पावसकर यांच्या ‘प्रेरणा थिएटर्स’ यांच्या वतीने ५५ वर्षांपूर्वीचं हे बालनाट्या पुन्हा एकदा रंगभूमीवर धमाल करण्यासाठी येत आहे. तेव्हा अभिनेत्री ईला भाटे यांनी नाट्यात अंजूची भूमिका साकारली होती. तर दिगंबर राणे आणि पावसकर दांपत्य या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत होते.
प्रेरणा थिएटर्स निर्मित ‘अंजू उडाली भुर्र’ हे नाटक १९ एप्रिल रोजी रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचे संगीत चला हवा येऊ द्या मधील संगीतकार तुषार देवलने केलं आहे. या बालनाट्यात अंकुरसोबत पूर्णिमा अहिरे, गुलाब लाड, चिंतन लांबे, विजय मिरगे, प्राची रिंगे, गौरवी भोसले, प्राधीर काजरोळकर, बाबली मयेकर आणि अंजूच्या भूमिकेत नवोदित बाल अभिनेत्री स्कंदा गांधी दिसणार आहे. दरम्यान, याआधी अंकुरने सर्किट हाऊस’, ‘फर्स्टक्लास’, ‘कन्हैया’, ‘करुन गेलो गाव’, ‘गाढवाचं लग्न‘ या नाटकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.