एकेकाळी 2 रुपयांच्या कमाईसाठी 'हा' अभिनेता लिहायचा भांड्यांवर नाव; 'चला हवा येऊ द्या'मधून झाला लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 01:11 PM2023-11-01T13:11:09+5:302023-11-01T13:11:38+5:30
Marathi actor: या अभिनेत्याने अथक मेहनत करत आज कलाविश्वात त्याची जागा निर्माण केली आहे.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या निखळ विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आज यातील प्रत्येक कलाकार यश, प्रसिद्ध आणि संपत्ती भोगत आहे. मात्र, या कार्यक्रमातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक कलाकरांना मोठा स्ट्रगल करुन हे यश संपादन केलं आहे. यातल्याच एका अभिनेत्याने तर कधी काळी चक्क भांड्यांवर नाव टाकायचंही काम केलं होतं.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अंकुर वाढवे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अंकुरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकेकाळी तो भांड्यांवर नाव टाकायचं काम करायचा हे या व्हिडीओवरुन स्पष्ट होतं. तसंच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही त्याने याविषयी खुलासा केला.
काही काळापूर्वी अंकुरच्या बहिणीचं लग्न झालं. त्यामुळे त्याला बऱ्याच वर्षांनी भांड्यांवर नाव टाकायचा योग जुळून आला. त्यामुळे त्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. एकेकाळी अंकुर भांड्यांवर नाव टाकायचं काम करायचा. या कामासाठी त्याला २ रुपये मिळायचे.
काय आहे अंकुरची पोस्ट?
बहिणीचं लग्न आहे त्यानिमिताने परत मशीन आईने हातात दिली आणि जुने दिवस बेलोऱ्याचे आठवले... बेलोऱ्यात लगीन सराईत भांड्यावर नाव टाकायचे दोन रुपये घ्यायचो... अक्षर चांगलं म्हणून लोकं यायचे. दिवसाला 100 रुपये कमवायचो... आज बायकोने एक कप चहा दिला..., असं कॅप्शन देत त्याने हा किस्सा शेअर केला.
दरम्यान, अंकुर अभिनेता असण्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया या नाटकात काम केले आहे.