'चला हवा येऊ द्या'फेम स्नेहल शिदमला तब्बल ३० मुलांनी दिला लग्नासाठी नकार; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:51 PM2022-02-01T17:51:09+5:302022-02-01T17:54:34+5:30
Snehal shidam: 'हे तर कायच नाय'च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर स्नेहलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात तिने लग्नाच्या आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं निळख मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम. 'चला हवा येऊ द्या' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली स्नेहल आज लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. अलिकडेच तिने 'हे तर कायच नाय' या शो मध्ये हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी तिने तिच्या लग्नाचा एक भन्नाट किस्सा शेअर केला.
'हे तर कायच नाय'च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या भागाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये स्नेहल तिचा लग्नाच्या आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.
"आमच्या घरात लग्नाचं वातावरण सुरु होतं. माझ्या बहिणींची वगैरे पण लग्न झाली होती. त्यामुळे मी लग्न करावं असा हट्ट सगळे धरु लागले. त्यामुळे मग मी सुद्धा लग्नासाठी तयार झाले. पण नावनोंदणी वगैरे मी काही करणार नाही असं कटाक्षाने सांगितलं. त्यावर त्याची काळजी करु नकोस ते आम्ही सगळं पाहतो असं घरातले म्हणाले. त्याच्यानंतर जवळपास ३० च्या आसपास मुलांना माझे फोटो पाठवले. त्यामुळे निदान एकतरी मुलगा हो बोलेल आणि आपण लग्न करुन सेटल होऊ असं मला वाटलं", असं स्नेहल म्हणाली.
पुढे ती म्हणते, "पण, या तीसही मुलांनी मला नकार दिला. त्यामुळे माझ्यात इतकं काय वाईट आहे की तब्बल ३० पोरं एकाच वेळी नकार देतात. बरं त्यातली काही मुलं माझ्यापेक्षा जास्त छपरी होती. त्यामुळे मग मी घरातल्यांना विचारलं की माझा नेमका कोणता फोटो दाखवलाय ज्यामुळे मला सगळी मुलं नाही म्हणतायेत."
दरम्यान, या शोमध्ये स्नेहलच्या घरातल्यांनी मुलांना कोणता फोटो पाठवला हे दाखवण्यात आलं. विशेष म्हणजे त्यांनी पाठवलेला फोटो हा एका स्किटमधील होता. ज्यात स्नेहलने एका राक्षसिणीची भूमिका साकारली होती.हा फोटो पाहिल्यावर दुसरा कोणताच फोटो सापडला नाही का असा प्रश्न स्नेहलने विचारला. त्यावर गुगलवर तुझे असेच फोटो आहेत असं म्हणत घरातल्यांनीही तिची फिरकी घेतली. विशेष म्हणजे स्नेहलचा हा अनुभव ऐकून उपस्थित सगळेच जण प्रचंड हसू लागले.