Kushal Punjabi's Death : कुशल पंजाबीचा जवळचा मित्र चेतन हंसराजने सांगितले त्याच्या आत्महत्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 03:28 PM2019-12-27T15:28:34+5:302019-12-27T15:35:22+5:30
Kushal Punjabi's Death : कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना कुशलच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. डीटीपी परमजीत सिंह दहिया यांनी कुशलच्या सुसाईड नोटबद्दलचे तपशील शेअर केले आहेत.
अभिनेता चेतन हंसराज आणि कुशल यांची खूप चांगली मैत्री होती. चेतनने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना कुशलने आत्महत्या का केली असावी याविषयी सांगितले आहे. त्याने सांगितले आहे की, कुशल त्याच्या पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर प्रचंड दुःखी होता. तसेच तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. तू कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेऊ नकोस... या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पड... असा सल्ला मी त्याला अनेकवेळा दिला होता. त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण कुशल असे काही करेल असे मला कधीच वाटले नव्हते...
कुशलचे आईवडील काल दुपारपासून आपल्या मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. पण कुशलचा फोन बंद येत होता. रात्र झाली तरी कुशलशी संपर्क होत नव्हता. कुशलचे आईवडील रात्री 10.30 वाजता तो राहत असलेल्या बिल्डींगमध्ये पोहोचले. त्यावेळी तो घरात एकटा होता. दरवाज्याची बेल वाजवल्यावरही तो प्रतिसाद देत नसल्याने आईवडिलांनी दरवाजा तोडला असता आत कुशलचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. कुशलने सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, असेही त्याने यात लिहिले आहे.
कुशलने नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेन्ड Audrey Dolhen हिच्यासोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे. कुशल मुलावर प्रचंड प्रेम करायचा. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती.