'उंच माझा झोका'मधली छोटी रमा या कारणामुळे कलाविश्वातून होती गायब, म्हणाली, "त्या मालिकेमुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 07:36 PM2023-09-25T19:36:04+5:302023-09-25T19:36:30+5:30
Unch Maza Jhoka : उंच माझा झोका या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर हिने निभावली होती.
छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या मालिका प्रसारीत होत असतात. या मालिकांपैकी काही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतात. या मालिका बंद झाल्या तरी रसिकांच्या मनात त्यांचं स्थान कायम करुन जातात. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे उंच माझा झोका. काही वर्षांपूर्वी उंच माझा झोका ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि खूप लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास रेखाटण्यात आला होता. या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते छोट्या रमाबाईंनी. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर हिने निभावली होती. तेजश्री आता बरीच मोठी झाली आहे. तिला आता ओळखणंदेखील कठीण झालं आहे. या मालिकेनंतर ती सिनेइंडस्ट्रीतून गायब होती. यामागचं कारण नुकतेच तिने सांगितले आहे.
लोकसत्ताशी बोलताना तेजश्री वालावलकर म्हणाली की, उंच माझा झोका मालिकेच्यावेळी मी पाचवीत होते. तीन वर्षांची असल्यापासून मी अभिनय क्षेत्रात काम करते आहे. काही मालिका आणि चित्रपटात काम केल्यानंतर उंच माझा झोका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर मात आणि चिंतामणी या दोन चित्रपटात काम केले. या चित्रपटात काम केल्यानंतर ‘उंच माझा झोका’सारख्या भूमिकांच्या ऑफर्स येत होत्या आणि माझ्या वयापेक्षा अगदीच मोठ्या होत्या. त्यामुळे मी अभिनयातून थोडासा ब्रेक घेतला. याचे मुख्य कारण म्हणजे उंच माझा झोकामुळे मला इमेज बदलायची होती.
तेजश्री पुढे म्हणाली की, दहावीनंतर मी जिंदगी नॉट आउट ही मालिका केली. पण या मालिकेनंतर लॉकडाऊनच्या काळात मी पडद्यामागच्या गोष्टी बारकाईने शिकण्याचा प्रयत्न केला. भविष्यात अभिनयातच करिअर करायचे असल्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त कलाकृती तयार करताना ज्या ज्या बाजू महत्त्वाच्या असतात त्यांची माहिती करून घेत होते आणि अजूनही हा अभ्यास सुरु आहे. या कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून कलाविश्वापासून दुरावले होते.