कॅमेऱ्याच्या मागे बसलेला या चिमुरड्याने साकारल्या आहेत दोन दिग्गजांच्या भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 12:48 PM2019-11-14T12:48:32+5:302019-11-14T13:14:36+5:30
अभिनयातील निरागसता हेच त्याच्या अभिनयाचे वैशिष्ट्य आहे.
स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिका गेली २ वर्ष अविरतपणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. विठुराया आणि पुंडलिकाच्या भक्तीचा सोहळा अनुभवल्यानंतर आता या मालिकेत नवा अध्याय सुरु झालाय. संत नामदेवांच्या रुपात संतपरंपरेची अखंड गाथा पाहायला मिळते आहे. खास बात म्हणजे छोट्या नामदेवांची भूमिका साकारणाऱ्या अमृत गायकवाडने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज बालदिनाच्या निमित्ताने त्याला विठुरायाकडून एक खास सरप्राईज मिळालं. कानडा राजा पंढरीचा या अभंगातील ‘हा नाम्याची खीर चाखतो...चोखोबाची गुरे राखतो’ या ओळी सुप्रसिद्ध आहेत. ‘विठुमाऊली’ मालिकेतही विठ्ठलाला खीर चाखण्यासाठी नामदेवाने आग्रह केल्याचा सीन करण्यात आला होता. मात्र बालदिनाच्या निमित्ताने विठुरायानेच छोट्या नामदेवाला खीर भरवली.
मालिकेत विठुराया आणि छोट्या नामदेवाच्या भक्तीचा सोहळा अनुभवायला मिळतोच आहे. मात्र खऱ्या आयुष्यातही छोट्या अमृतची आणि विठ्ठलाची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्यची छान मैत्री आहे. सेटवर अखंड दोघांची बडबड सुरु असते. पडद्यामागची हीच केमिस्ट्री पडद्यावरही खुलून दिसते.
याआधी छोट्या आंबेडकरांच्या रुपात प्रेक्षकांनी अमृत गायकवाडला भरभरुन प्रेम दिलंय. अमृतच्या अभिनयातला हाच निरागसपणा छोट्या नामदेवांच्या रुपातही अनुभवायला मिळतो आहे.