सीआयडीने अनेक वर्षांपूर्वी केले होते कोरोनाचे भाकित? शिवाजी साटम आजही विसरले नाहीत तो एपिसोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 02:14 PM2020-05-12T14:14:32+5:302020-05-12T14:15:30+5:30
सीआयडी या प्रसिद्ध मालिकेच्या एका भागात एका विषाणूमुळे लोकांचा जीव जात असल्याचे दाखवण्यात आले होते.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या व्हायरसमुळे भीषण स्थिती आहे. कोरोनाची सध्या जगभर चर्चा असल्याने कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचे संदर्भ असलेल्या वेबसिरिज, काही पुस्तकं काही वर्षांपूर्वी लोकांच्या भेटीस आली होती असा दावा सध्या इंटरनेटवर केला जातोय. या सगळ्यात आता सीआयडी या प्रसिद्ध मालिकेचा देखील समावेश झाला आहे.
सीआयडी या मालिकेने अनेक वर्षं प्रेक्षकांवर राज्य केले. या मालिकेच्या एका भागात कोरोनासारख्या विषाणूमुळे लोकांचा जीव धोक्यात आला होता आणि या प्रकरणाचा उलगडा एसीपी प्रद्युमन आणि त्याच्या टीमने केला होता असे दाखवण्यात आले होते. २०१३ ला प्रदर्शित झालेल्या या भागाचे नाव किस्सा खतरनाक व्हायरस का असे होते. हा भाग आजही एसीपी प्रद्युमनच्या भूमिकेत असलेल्या शिवाजी साटम यांच्या चांगल्याच लक्षात आहे. त्यांनीच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत या भागाचा उल्लेख केला आहे.
शिवाजी साटम यांनी सांगितले आहे की, या भागाला अनेक वर्षं झाले असले तरी आजही हा भाग माझ्या चांगल्याच लक्षात आहे. या भागात एका विषाणूचा संसर्ग सर्वत्र झाला असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे या मालिकेच्या भागात आम्ही मास्क, सूट परिधान केले होते. सीआयडीमध्ये दाखवण्यात आले होते की या विषाणूचा संसर्ग हात मिळवल्याने, शिंकल्याने, खोकल्याने होतो. या विषाणूची लागण झाल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले होते.
सीआयडी या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या मालिकेतील एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत या व्यक्तिरेखांनी अनेक वर्षं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले असून या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.