आधी 'बिग बॉस' लवकर संपवलं, आता लोकप्रिय मालिका ७ महिन्यांतच बंद होणार? अभिनेत्याची पोस्ट ठरतेय चर्चेचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:40 IST2024-11-07T10:39:49+5:302024-11-07T10:40:07+5:30
नव्या मालिका येत असताना कलर्स मराठीवरील एक लोकप्रिय मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घ्यायच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.

आधी 'बिग बॉस' लवकर संपवलं, आता लोकप्रिय मालिका ७ महिन्यांतच बंद होणार? अभिनेत्याची पोस्ट ठरतेय चर्चेचं कारण
गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. कलर्स मराठी वाहिनीनेदेखील नवीन विषय असलेल्या काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. 'अबीर गुलाल', 'इंद्रायणी', 'दुर्गा' या अलिकडेच सुरू झालेल्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर 'पिंगा गं पोरी पिंगा', 'अशोक मामा' या नव्या मालिकांसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण, नव्या मालिका येत असताना कलर्स मराठीवरील एक लोकप्रिय मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घ्यायच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
मालिकेच्या नायकाची पोस्ट या चर्चेचं कारण ठरली आहे. ही मालिका म्हणजे 'अबीर गुलाल'. मे महिन्यांत सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील श्री, अगस्त्य आणि शुभ्रा यांचं प्रेमाचं त्रिकुट पाहायला प्रेक्षकांनाही मजा येत होती. मात्र आता अवघ्या काही महिन्यांतच ही मालिका संपणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मालिकेत नुकतंच अगस्त्य आणि श्रीचं लग्न झालं आहे. श्री आणि अगस्त्यमध्ये जवळीक निर्माण होत असून त्यांचं नातंही खुलत आहे. मालिका रंजक वळणावर असतानाच बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे अक्षय केळकरने केलेली पोस्ट.
'अबीर गुलाल' मालिकेत अगस्त्यची भूमिका साकारणाऱ्या अक्षय केळकरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने मालिकेच्या सेटवरचे त्याचे अगस्त्यच्या भूमिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने "अगस्त्यचे शेवटचे काही दिवस..."अगस्त्य" ला भरभरून प्रेम दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अगस्त्य मला दिल्या बद्दल @colorsmarathi चे मनापासून आभार. I love You मी फक्त तुमचाच आहे", असं कॅप्शन त्याने दिलं आहे. त्याच्या या पोस्टमुळे 'अबीर गुलाल' मालिका संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अक्षयच्या या पोस्टमुळे चाहते संभ्रमात आहे. मालिका संपणार आहे की अक्षय ही मालिका सोडत आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. चांगली मालिका लवकर निरोप घेत असल्याने चाहते नाराज आहेत.