सिद्धार्थ सागरचा साखरपुडा मोडला, कॉमेडियनवर केले हे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 14:19 IST2019-05-31T13:35:08+5:302019-05-31T14:19:34+5:30
सिद्धार्थ आता टीव्हीवर परतलाय. पण आता त्याची होणारी बायको त्याला सोडून गेलीय. होय, शुभी जोशी हिने साखरपुडा मोडत सिद्धार्थवर गंभीर आरोप केले आहेत.

सिद्धार्थ सागरचा साखरपुडा मोडला, कॉमेडियनवर केले हे गंभीर आरोप
कॉमेडियन सिद्धार्थ सागर याच्या पर्सनल लाईफमध्ये सध्यातरी फार काही ‘आॅल वेल’ नाही. मध्यंतरी सिद्धार्थ सागर अनेक महिने बेपत्ता होता. तो कुठेय, काय करतोय, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर मोहिम छेडली होती. यानंतर अचानक एकेदिवशी सिद्धार्थने लोकांसमोर येत, अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आई मला ड्रग्ज द्यायची. तिने मला बळजबरीने पागलखान्यात भरती केले होते, असे अनेक आरोप त्याने केले होते. सिद्धार्थ आता टीव्हीवर परतलाय. पण आता त्याची होणारी बायको त्याला सोडून गेलीय. होय, शुभी जोशी हिने साखरपुडा मोडत सिद्धार्थवर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी २०१६ मध्येही सिद्धार्थ व शुभीचे ब्रेकअप झाले होते. पण यानंतर पुन्हा ते एकत्र आले होते.
लग्नापूर्वी सिद्धार्थ मारहाण करतो. अगदी क्षुल्लक कारणांवरून भांडणाला उठतो, असा आरोप शुभी जोशीने केला आहे. २०१८ मध्ये सिद्धार्थ व शुभीचा साखरपुडा झाला होता. एका एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना शुभीने सांगितले की, २०१६ मध्ये आम्ही वेगळे झालोत, तेव्हा त्याने यासाठी त्याच्या आईला दोषी ठरवले होते. पण माझ्यामते, सिद्धार्थची आई त्यासाठी पूर्णपणे जबाबदार नव्हती. साखरपुडा झाल्यानंतर, सिद्धार्थचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. मी हे नाते सांभाळण्याचे माझ्यापरीने खूप प्रयत्न केलेत. तो क्षुल्लक कारणांवरून भांडतो. मारहाण करतो, हिंसक होतो. मार्चमध्ये त्याने मला मारहाण केली तेव्हा पोलिसांना बोलवावे लागले होते. पोलिस मला मेडिकल चेकअपसाठी घेऊन जात असताना तो पूर्णवेळ माझी चूक झाली, म्हणून रडत होता. त्याचे ते रडणे बघून मी पोलिसांना त्याला सोडून देण्याची विनंती केली होती. पण असे करून मी खूप मोठी चूक केली होती, हे मला नंतर कळले. तो परिस्थतीपासून दूर पळणारा पुरूष आहे.
सिद्धार्थ म्हणतो वेगळेच काही...
अडीच महिन्यांपूर्वीच आमचा साखरपुडा मोडला. आम्ही आता सोबत नाही. मी काम करत होतो, पैसे कमवत होतो, तोपर्यंत सगळे काही ठीक होते. पण पैशांची तंगी सुरु झाल्यावर आमच्यात भांडणे होऊ लागली. मी खूप काही सहन केले आहे. आमच्यात भांडण झाले तेव्हा तिने मला आधी मारले. माझ्या नाकातून रक्त वाहत होते. ती मला सोडत नव्हती.स्वत:ला सोडवून घेण्यासाठी मी तिला दूर ढकलले. यात तिला दुखापत झाली. मी तिथून पळून गेलो. पण तोपर्यंत तिने पोलिसांना बोलवले होते. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. पण मला माझी स्पेस हवी होती. तिला त्यातही अडचण होती, असे सिद्धार्थने सांगितले.
केले होते आरोप
काही दिवसांपूर्वी एका पत्रपरिषदेत सिद्धार्थने आईवर अनेक आरोप केले होते. माझ्या आईच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी एक व्यक्ती आली आणि त्यांच्यासोबत तिला नव्याने आयुष्याला सुरुवात करायचीयं, असे मला सांगितले. प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे हा विचार करून मी देखील तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. पण काहीच दिवसांत आईचे वागणे खूप बदलले.याचदरम्यान माझे वजन कमी होत होते. त्यामुळे मी स्मोकिंग कमी केले आणि कॉफी जास्त पिऊ लागलो होतो. मी याविषयी आईला सांगितले तर तिने मला सांगितले की, मला बायपोलर नावाचा आजार आहे आणि त्यासाठी ती मला न सांगता माझ्या जेवणातून ड्रग्स देत आहे. या आजाराविषयी ऐकून मला आश्चयार्चा धक्का बसला. कारण मला या आजाराविषयी माहिती होते आणि मला स्वत:मध्ये या आजाराचे संकेत कधीच दिसले नव्हते. माझ्या आर्थिक व्यवहारात सुयश गाडगीळ (आईच्या आयुष्यात असलेली व्यक्ती) ढवळाढवळ करू लागला होता. त्यामुळे अनेकवेळा आमच्यात भांडणं होत असे. माझ्या आईने मला न सांगता माझे ९०-९५ लाख खर्च केले होते. काहीच दिवसांनी त्या दोघांनी मिळून मला रिहॅबिटेशन सेंटरमध्ये टाकले. तिथे माझ्यावर प्रचंड अत्याचार व्हायचे. काही वेळा तर मी रक्तबंबाळ व्हायचो. माझी शुद्धदेखील हरपायची. कसेतरी करून मी माझ्या मॅनेजरशी संपर्क केला आणि त्याने मला तिथून बाहेर काढले. घरी आल्यावर सगळे काही सुरळीत होईल असे मला वाटत होते. पण मी गोव्याला गेलो असताना मला उचलून पागलखान्यात दाखल करण्यात आले,असे अनेक आरोप सिद्धार्थ केले होते.