"माझं अपहरण झालं होतं अन्..."; पोलिसांशी संपर्क साधताना सुनील पालचं धक्कादायक विधान, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 09:08 AM2024-12-04T09:08:34+5:302024-12-04T09:09:34+5:30
कॉमेडीयन सुनील पालशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्याने धक्कादायक खुलासा केलाय. काय घडलं नेमकं बघा (sunil pal)
कॉमेडीयन सुनील पालविषयी काल धक्कादायक बातमीचा उलगडा झाला. सुनील २ दिवस बेपत्ता असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सुनीलच्या पत्नीने याविषयी सांताक्रूझ येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पुढे अवघ्या काहीच तासांमध्ये पोलिसांना सुनीलचा ठावठिकाणा सापडला. त्यावेळी सुनीलने पोलिसांशी संपर्क साधताना तो बेपत्ता नव्हे तर त्याचं अपहरण करण्यात आलं होतं, असा खुलासा कॉमेडियनने केला. काय घडलं नेमकं?
सुनील पाल पोलिसांना काय म्हणाला?
सुनील पाल अचानक गायब झाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला. सुनीलच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना सुनीलचा ठावठिकाणा सापडला. त्यावेळी पोलिसांशी संपर्क साधताना सुनील म्हणाला की, "मी बेपत्ता झालं नव्हतो तर माझं अपहरण झालं होतं." कोणतं उद्दिष्ट ठेऊन सुनीलचं अपहरण करण्यात आलं, हे मात्र अद्याप समजलं नाही. दरम्यान सुनीलला पुन्हा घरी आणण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झालीय.
पत्रकार परिषदेत होणार उलगडा
सुनील पालची पत्नी सरिताने दैनिक भास्करसोबत शेअर केलेल्या अपडेटमध्ये सांगितले की, "सुनील बरा आहे आणि तो दिल्लीहून मुंबईला येत आहे. मी आत्ताच साऱ्या प्रकाराबाबत फार काही सांगू शकणार नाही. सध्या मी पोलीस ठाण्यात आहे. सुनील एका पोलिस अधिकाऱ्याशी बोलला आणि तो परत मुंबईला येत असल्याचा निरोप दिला. सुनील घरी परतल्यानंतर मी त्याच्याशी बोलेन आणि मला जे काही कळेल ते उद्याच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांना सांगेन." त्यामुळे आज पत्रकार परिषदेत खुलासा होणार आहे.