'मराठी मालिकांतून महायुतीचा छुपा प्रचार' काँग्रेस नेते सचिन सावंतांनी थेट व्हिडीओच केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:19 PM2024-11-15T12:19:30+5:302024-11-15T12:20:13+5:30
महायुतीकडून मालिकांमध्ये जाहिरातींची घुसखोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
Congress Leader Sachin Sawant : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेत्यांच्या प्रचारसभांनी वातावरण तापू लागलं आहे. मोठ्या राजकीय नेत्यांच्या सभा सुरू असतानाच आता बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतले स्टार प्रचार करताना दिसतायत. पण एवढ्यावरच अवलंबून न राहता पक्षांपासून पक्षीय उमेदवारांपर्यंत साऱ्याच उमेदवारांनी पारंपरिक प्रचाराला बगल देत हायटेक प्रचाराला जवळ केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणा वेगवेगळ्या पक्षांच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत. महायुतीकडून मालिकांमध्ये सुद्धा जाहिरातींची घुसखोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी त्याच्या ट्विटरवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या जाहिराती स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या "घरोघरी मातीच्या चुली" आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या "प्रेमाची गोष्ट"मध्ये पाहायला मिळत आहे. हे व्हिडीओ शेअर करत सावंत यांनी लिहलं, "महायुतीने छुप्या जाहिराती करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या "घरोघरी मातीच्या चुली" या मालिकेत दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी प्रक्षेपित आणि १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता व ४ वाजता पुन: प्रक्षेपित भागात खुलेआम महायुतीच्या (शिंदे सेनेच्या) जाहिरातीचे चित्रिकरण दाखवण्यात आले आहे. त्याच पध्दतीने "प्रेमाची गोष्ट" व इतरही मालिकांमध्ये ही जाहिरात चित्रांकीत करण्यात आली आहे".
पुढे त्यांनी लिहलं, "एका सीन वरून दुसऱ्या सीनवर जाताना ही जाहिरात दाखवली जात आहे. निवडणूक आयोगापासून हे लपवून केले जात आहे. विशेष म्हणजे डिस्ने हॉट स्टारवर या चॅनलमधील या मालिकेचे भाग दिसतात. पण कुठही रेकॉर्ड राहू नये म्हणून तीथे जाहिरातींचा भाग दडवण्यात आला आहे. संविधान, लोकशाही, निवडणूक आयोग यांची तमा तर यांना नाहीच पण नैतिक पातळीवर ही यांचे अध:पतन झाले आहे. अशा किती कुटील क्लुप्त्या यांनी वापरल्या आहेत हे निवडणूक आयोगाने शोधून काढले पाहिजे. सदर प्रकाराचा जाहीर निषेध करतो तसेच कारवाईची मागणी करतो. इतर वाहिन्यांवर असाच प्रकार घडला असल्याची दाट शक्यता आहे. मी स्वतः पेनड्राईव सहित पुरावा घेऊन आज १२ वाजता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे व तक्रार दाखल करणार आहे".
भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यानंतर काही दिवसातच राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.