कोरोनाचा फटका बसला या नवीन मालिकांना, प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 17:55 IST2022-01-14T17:54:29+5:302022-01-14T17:55:21+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवीन येणाऱ्या मालिकांचे प्रसारण पुढे ढकलण्यात आल्याचे समजते आहे.

कोरोनाचा फटका बसला या नवीन मालिकांना, प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे?
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवीन येणाऱ्या मालिका सत्यवान सावित्री आणि पिंकीचा विजय असोचे प्रसारण पुढे ढकलण्यात आल्याचे समजते आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेचे प्रसारण आता लग्नाची बेडी मालिकेसोबत ३१ जानेवारीला होण्याची शक्यता आहे. पिंकीचा विजय असो मालिकेमुळे तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेची वेळ बदलण्यात येणार होती. पण आता पिंकीचा विजय असो या मालिकेचे प्रसारण पुढे ढकलण्यात आल्यामुळे तुझ्या इश्काचा नादखुळा त्याच्या नेहमीच्या वेळेत म्हणजे रात्री ११ वाजता, १७ जानेवारीनंतरही पाहायला मिळेल.
झी मराठीवर 'सत्यवान सावित्री' ही पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोमध्ये एक मोठा वटवृक्ष दिसून येत आहे. सोबतच सत्यवान-सावित्रीची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच पिंकीचा विजय असो ही मालिका १७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता ही नवीन मालिका भेटीला येणार होती. मात्र ही मालिकेचे प्रसारण पुढे ढकलण्यात आले आहे. या मालिकेत आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट उलगडणार आहे. खाईन तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवते. दुसऱ्याकडून काम करुन घेण्याचे अजब कसब पिंकीकडे आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.