Corona Virus: शुटिंगसाठी ज्येष्ठ कलाकारांना नो एंट्री, बच्चेकंपनीला परवानगी कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 09:44 AM2020-06-19T09:44:07+5:302020-06-19T09:50:14+5:30
कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं. चित्रपट, टीव्ही या क्षेत्राशी संबंधित लोकांचे हाल सुरु आहेत.
मुंबईसह राज्यात आणि देशभरात कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अशा परिस्थिती अर्थचक्राला गती मिळावी आणि ठप्प झालेल्या गोष्टी पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी मिशन बिगीन अगेनचा नारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं. चित्रपट, टीव्ही या क्षेत्राशी संबंधित लोकांचे हाल सुरु आहेत. त्यामुळेच लवकरच मालिका चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही अटी शर्तींचं पालन करावं लागणार आहे. यानुसार ६० वर्षांवरील कलाकारांना शुटिंग करता येणार नाही. शुटिंग लोकेशनवर या कलाकारांना येता येणार नाही असे आदेश देण्यात आलेत.
'गुड्डन तुमसे' 'ना हो पायेग, ''तुमसे ही राबता', 'कुमकुम भाग्य', 'कुंडली भाग्य','कुरबान हुआ', 'अग्गंबाई सासूबाई', 'प्रेम', 'पॉइजन पंगा' आणि 'सारेगामा लिटील चॅम्प' या मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आलीय. मात्र एकीकडे ६० वर्षांवरील कलाकारांना बंदी असताना लहान मुलांना सेटवर परवानगी कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला निमित्त ठरलं आहे 'सारेगामा लिटील चॅम्प'. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये लहान मुलांनी शुटिंगस्थळी येणं कितपत योग्य आहे?, कार्यक्रमासाठी त्यांचा जीव धोक्यात का घालायचा असे सवाल यामुळे निर्माण झालेत.
यासंदर्भात लोकमतने अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्याशी संवाद साधला. तिने सांगितले की, या निर्णयाचा तिने जाहीर निषेधच केला आहे. “लहान मुलांना शूटिंग करण्यास परवानगी देणे योग्य नाही. त्यांच्या जीवाशी हा खेळच आहे. म्युझिक शो असल्यामुळे गाण्यासाठी त्यांना माईकची गरज लागणार अशावेळी सगळीकडे त्यांना हात लावावा लागणार. कोरोनाचा संसर्ग हा झपाट्याने पसरतो. योग्य आहे की नाही इथे बसून मला बोलणे बरोबर वाटत नाही”. सगळ्या गोष्टींमागे बराच विचार झालेला असतो. मला मुलं असते तर मी नसते पाठवले असंही तिने सांगितले. कोरोनावर औषध नाहीत. हे कसे रोखायचे याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. त्यामुळे सर्वात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. गाणं म्हटल्यावर सगळे माईक्स येतात. ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचं योग्यरितीने पालन होणार आहेत का? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. लिटील चँम्प्सबाबत थोडे विचित्रच वाटते. ६० वर्षावरील व्यक्ती आणि लहान मुलांसाठी याचा सर्वात जास्त धोका असतो. कोरोना कसा पसरतो याविषयी आपल्याला माहिती नाही. अशात मुलांना शूटिंगसाठी पाठवणे नक्कीच रिस्क आहेच असं तिनं म्हटलं आहे.
कोणत्याही मुद्यावर थेट आणि परखड मत मांडणाऱ्या अभिनेता जितेंद्र जोशीनंही यावर आपली भूमिका मांडलीय. कोरोनाच्या गंभीर स्थितीतही मुलांना लिटील चॅम्पसारख्या कार्यक्रमांमध्ये पाठवायचं की नाही हा निर्णय त्यांच्या पालकांनी घ्यावा असं जितेंद्रनं म्हटलं आहे. कार्यक्रम सुरु करणारे करतील, मात्र पाठवणाऱ्यांनी विचार करणं गरजेचं असल्याचंही जितेंद्र सांगायला विसरला नाही. या परिस्थितीत मुलीला शाळेतही पाठवणार नाही असं जितेंद्रने सांगितलं आहे.