१० महिन्यांतच मोडलं दुसरं लग्न, अफेअर असल्याचा आरोप; दलजीतचा पती म्हणतो- "ती स्वत:च सोडून गेली..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:57 PM2024-05-30T14:57:55+5:302024-05-30T15:06:08+5:30
दलजित कौरने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्रामवर पती निखिल पटेलचा एक फोटो शेअर करत त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं होतं. यावर आता निखिलने मौन सोडत भाष्य केलं आहे.
टीव्ही अभिनेत्री दलजित कौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दलजितच्या संसारात वादळ आलं आहे. पहिल्या लग्नाच्या कटू आठवणींनतर दलजितने गेल्याच वर्षी पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. निखिल पटेलसह दलजीतने पुन्हा संसार थाटला होता. मात्र आता तिचं दुसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असून दलजितने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. दलजितच्या या आरोपांवर आता निखिलने उत्तर दिलं आहे.
दलजित कौरने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्रामवर पती निखिल पटेलचा एक फोटो शेअर करत त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं होतं. यावर आता निखिलने मौन सोडत भाष्य केलं आहे. "मी नेहमीच सन्मानपूर्वक आणि स्पष्टपणे विश्वासात घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ माझ्यासाठीच नाही तर यामध्ये असलेल्या सगळ्यांसाठीच हे महत्त्वाचं आहे. जानेवारी महिन्यात दलजीतने मुलगा जेडनसह केन्या सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही वेगळे झालो. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहू शकत नाही, याची जाणीव आम्हाला झाली. दलजीतला करिअर आणि भारतातील जीवनशैलीबरोबर केन्यामध्ये राहणं कठीण जात होतं. अनेक प्रयत्न करुनही तिला ते जमलं नाही. दोन कुटुंबातील परंपरा, प्रथा वेगळ्या असल्यामुळे ते जुळवून घेणंही कठीण जात होतं. मार्च २०२३ मध्ये आम्ही मुंबईत पारंपरिक पद्धतीने लग्न केलं होतं. सांस्कृतिकरित्या या गोष्टीला महत्त्व असलं तरी आन्ही लग्न रजिस्टर केलेलं नव्हतं," असं निखिल ईटाइम्सशी बोलताना म्हणाला.
"दलजीतने जेव्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने मला, जेडनच्या शाळेत आणि अन्य काही व्यक्तींना केन्यामध्ये परत येण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. ती केवळ तिचं सामान घेण्यासाठी परत येणार आहे. तिचं मला सोडून जाणं हे माझ्यासाठी आमचं नातं संपल्यासारखं आहे. गेल्या काही महिन्यांत तिने केलेल्या सोशल मीडिया पोस्टचा मला त्रास झाला आहे. यातून मला सकारात्मकरित्या बाहेर पडायचं आहे. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमध्ये चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीला कंट्रोल करणं कठीण आहे. तिला माझ्या आयुष्यात परत यायचं आहे. पण आता ते शक्य नाही कारण तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत", असंही पुढे त्याने सांगितलं.
दलजीत आणि निखिलने १० मार्च २०२३ मध्ये लग्न केलं होतं. निखिल केनियामध्ये फायनान्स सेक्टरमध्ये काम करतो. निखिलशी विवाह करत तिने दुसऱ्यांदा संसार थाटला. पण, आता वर्षभरातच तिचं दुसरं लग्नही मोडलं आहे. दलजीतने २००९ साली बिग बॉस फेम अभिनेता शालिन भनौतशी लग्न करत संसार थाटला होता. लग्नाच्या ६ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. दलजितने शालिनवरही अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यांना जेडन हा मुलगा आहे.