Dalljiet Kaur Divorce: घटस्फोटाच्या चर्चांवर दलजीत कौरने दिली प्रतिक्रिया, नक्की झालं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 05:19 PM2024-02-12T17:19:51+5:302024-02-12T17:24:05+5:30
दलजीत कौरने सोडलं मौन
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) सध्या घटस्फोटांच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दुसऱ्या लग्नानंतर ती पतीसोबत केनिया येथे शिफ्ट झाली होती. तिला एक मुलगा असून तिच्या दुसऱ्या पतीला दोन मुलं आहेत. सध्या तिचं दुसऱ्या नवऱ्याशीही पटत नाहीए. निखिल पटेलसह ती घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे दलजीत कौर आपल्या लेकासह भारतात परतली आहे. तिने पतीसोबतचे फोटोही सोशल मीडियावरुन काढले आहेत. आता दलजीतने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
अनेक मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसलेली दलजीत कौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली होती. टीव्ही सेलिब्रिटी शालीन भनोतचा तिचा पहिला पती होता. त्यांचा एक मुलगा आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावत तिने शालीनला घटस्फोट दिला. यानंतर तिच्या आयुष्यात निखिल पटेलची एन्ट्री झाली. निखिलसोबत लग्न केल्याने ती खूप खूश होती. मात्र आता तिच्या अचानक भारतात येण्यामागचं कारण समोर आलं आहे. एबीपी न्यूजला प्रतिक्रिया देताना दलजीत म्हणाली, "मी अद्याप कोणाशीच बोललेले नाही. त्यामुळे गैरसमज करुन घेऊ नका."
दुसरीकडे दलजीत कौरच्या टीमने स्टेटमेंट दिले की, "दलजीत आणि तिचा मुलगा जेडन यावेळी तिच्या आईवडिलांच्या सर्जरीसाठी भारतात परतले आहेत. आधी तिच्या वडिलांची आणि नंतर आईची सर्जरी झाली. त्यामुळे तिला त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे. दलजीत सध्या कोणत्याच गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही कारण फोटोंमध्ये मुलं आहेत. मुलांची प्रायव्हसी जपली पाहिजे अशी विनंती तिने केली आहे."
दलजीत काही दिवसांपूर्वीच 41 वर्षांची झाली आहे. दुसऱ्या लग्नानंतर तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याही वयात ती प्रचंड फीट आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिचं खूप कौतुकही केलं. दलजीत 'इस प्यार को त्या नाम दूँ' मालिकेत झळकली होती.