डान्स-अॅक्टिंग यांच्यावर माझं समान प्रेम-अभिनेता सुमेध मुदगलकर
By अबोली कुलकर्णी | Published: September 26, 2018 07:28 PM2018-09-26T19:28:58+5:302018-09-26T19:29:20+5:30
अभिनेता म्हणजे सुमेध मुदगलकर याने अभिनय आणि डान्स यांचे कुठलेही औपचारिक प्रशिक्षण न घेता त्याने अभिनयाच्या क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली. आता तो अॅण्ड टीव्ही वाहिनीवरील ‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘व्हेंटिलेटर’, ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय साकारलेला नवा हॅण्डसम अभिनेता म्हणजे सुमेध मुदगलकर. अभिनय आणि डान्स यांचे कुठलेही औपचारिक प्रशिक्षण न घेता त्याने अभिनयाच्या क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली. आता तो अॅण्ड टीव्ही वाहिनीवरील ‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याशी याविषयी साधलेला हा संवाद...
* ‘राधाकृष्ण’ या स्टार भारत वाहिनीवरील मालिकेत तू कृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहेस. काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी आणि कोणती खास तयारी करावी लागली?
- मी कृष्णाची भूमिका करतोय. या मालिकेचा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हा मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजले. मला कृष्णाची भूमिका करायला मिळणार, या विचाराने मला आनंद झाला होता पण त्यासोबतच खूप जबाबदारी देखील माझ्या खांद्यावर आली होती. मी मग कृष्णाचे साहित्य वाचायला सुरूवात केली. सेटवर मी एकदा बासरी हातात घेतली अन् मग मला तिचा लळाच लागला. मग मला एक बाब सतावू लागली ती म्हणजे कृष्णाच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असतं त्याचं गमक काय? याचा शोध मी सुरू केला. अजूनही मी त्या प्रश्नाचा शोध घेतोय.
* मल्लिका सिंग ही राधेच्या रूपात दिसणार आहे. कशी आहे तिच्यासोबतची तुझी बाँण्डिंग?
- मल्लिकासोबतची माझी बाँण्डिंग खूप चांगली आहे. आमचे विचार, स्वभाव जुळतात. त्यासोबतच आमच्या संपूर्ण टीमचीच खूप चांगली गट्टी आहे. मी काम करत असताना एन्जॉय करतो.
* मालिकेचा सेट आणि संगीत खूपच वेगळे आहे काय सांगशील?
- खरंय. मालिकेचा सेट आणि संगीत या दोन्ही गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. दोन, तीन गाणी बनवण्यात आली असून त्यांचे संगीत आणि माधुर्य हे खूपच विलक्षण आहे. प्रेक्षकांना हे संगीत खरंच खूप आनंद देईल, यात काही शंका नाही.
* डान्स आणि अभिनय यांची तू कुठलीही फॉर्मल ट्रेनिंग घेतलेली नाहीस. मग अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय कसा घेतलास?
- खरंतर मला अभिनय क्षेत्रात यायचे होतेच. त्यानंतर मी डान्सची देखील प्रॅक्टिस करायला सुरूवात केली. मग मला आवड लागली आणि मला आॅफर्सही येत गेल्या. इंडस्ट्रीत कुणीही गॉडफादर नसल्याने मला हा स्ट्रगल करावाच लागणार होता. त्यामुळे तीच माझी संघर्षाची खरी सुरूवात होती.
* दिल दोस्ती डान्स मधून तू डेब्यू केलास आणि चक्रवर्ती अशोका या मालिकेतही काम केले. व्हेंटिेलेटरमधली करणची भूमिका केल्यानंतर तुझ्याकडे चित्रपटांची लॉटरीच लागली. कसं वाटतं जेव्हा करिअरच्या सुरूवातीलाच एवढ्या मोठया आॅफर्स येतात तेव्हा?
- होय. खरंच खूप छान वाटतं. खरंतर मी माझ्या कुटुंबाला आणि मेहनतीला याचे श्रेय देतो. माझ्या डोक्यात सतत असा विचार सुरू असतो की, मला आता काय वेगळे काम करायचे आहे? अखेर एखाद्या कलाकाराची भूक म्हणजे त्याचं कामचं असतं. मला ही भूक कायम असते. मला सतत काम मिळावं असंच वाटतं. मला अजून खूप शिकायचे आहे.
* तू मालिका आणि चित्रपट या दोन्ही प्रकारांत काम केलं आहेस. कोणता फरक जाणवतो?
- फरक तर जाणवतोच. कारण चित्रपटाच्या चित्रीकरणाचा कालावधी कमी आहे. त्या तुलनेत मालिकेला बराच वेळ द्यावा लागतो. दररोज शूटिंग करावं लागतं. अभिनय शैली वेगळी पण, चित्रपट की मालिका त्यापरत्वे ते बदलत जाते.
* तुझं पहिलं प्रेम डान्स की अॅक्टिंग?
- तसं काही नाहीये. डान्स आणि अॅक्टिंग या दोघांवरही माझं सारखंच प्रेम आहे. मी त्यांच्यावर कायम प्रेम करत राहीन.
* तू ‘बकेट लिस्ट’ मध्ये माधुरी दिक्षीत यांच्यासोबत काम केलं आहेस. काय शिकायला मिळालं यांच्याकडून?
- माधुरी दिक्षीत या खूपच नम्र आहेत. त्यांच्याकडून मी शिस्त पाळायला शिकलो. शूटिंग सकाळी ८ वाजता सुरू व्हायचं तर त्या शार्प ७:३० वाजता सेटवर हजर असायच्या. ही मोठी माणसं जेवढी नम्र असतात तेवढीच मेहनतीही असतात. मला तसंच राहायचंय.
* आता पुन्हा एकदा बॉलिवूडसाठी काम करण्याची संधी मिळाली तर कुणासोबत करायला आवडेल?
- तसं सांगता येणार नाही. पण, नक्कीच कोणत्याही कलाकारासोबत काम करायला आवडेल. कुठलंही काम हे लहान-मोठं असं नसतं. त्यामुळे काम करत राहणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
* अभिनयाच्या क्षेत्रात तुझे प्रेरणास्थान कोण?
- असं काही मी ठरवलं नाहीये. बॉलिवूडमध्ये जे कलाकार मेहनती आहेत त्यांचा मला अभिमान आहे. प्रत्येकासोबत कधीतरी काम करायला आवडेल. मला मेहनती लोकं खूप आवडतात.