'तारक मेहता'मध्ये दयाबेनचं कमबॅक?, दिशा वकानीला आता ओळखणं झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 05:31 PM2023-07-18T17:31:25+5:302023-07-18T17:31:48+5:30
Disha Vakani : दिशा वकानीने काही वर्षांपूर्वी प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही.
तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashma) हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. ही मालिका १५ वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका २००८ मध्ये प्रसारित झाली होती. तेव्हापासून चाहत्यांना हा शो खूप आवडतो. कथानकापासून ते स्टार कास्टपर्यंत सर्व काही उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे. मात्र, हा शो अनेकदा वादातही सापडला होता. अनेक कलाकारांनी शो सोडला तर काहींनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोपही केले. या शोमध्ये अनेक कलाकारांच्या रिप्लेसमेंटही झाल्या आहेत. तथापि, दयाबेनच्या भूमिकेसाठी अद्याप कोणत्याही नवीन अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली नाही.
खरे तर दिशा वकानीने काही वर्षांपूर्वी प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही. एका एपिसोडमध्ये ती एकदाच दिसली होती. चाहते तिला खूप मिस करत आहेत. मध्यंतरी दिशा वकानीने शो सोडल्याचे वृत्त होते आणि निर्माते तिच्या जागी नवीन चेहरा शोधत आहेत. मात्र, आता दिशा वकानी शोमध्ये परत येऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. पिंकविलाच्या बातमीनुसार, दिशा वकानी यावर्षी दिवाळीपर्यंत शोमध्ये परत येऊ शकते. चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्तांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
शोच्या कथानकाबद्दल बोलायचे तर जेठालाल दयाबेनला खूप मिस करत आहेत. त्याला दयाला परत गोकुळधाममध्ये पहायची आहे. जेठालाल दया परतण्याबाबत ठाम आहे. यावर सुंदरने दया लवकरच गोकुळधाममध्ये दिसणार असल्याची घोषणा केली आहे.