प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसाठी केलं मुंडण; नवस पूर्ण करण्यासाठी कापले सगळे केस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 03:48 PM2022-05-31T15:48:54+5:302022-05-31T15:49:20+5:30
Deepti dhyani: अभिनेत्री तर त्यांचा फिटनेस आणि सौंदर्याकडे कटाक्षाने लक्ष देतात. परंतु, या लोकप्रिय अभिनेत्री या सगळ्याकडे दुर्लक्ष करत केवळ आपल्या पतीचा विचार करुन संपूर्ण केस कापले.
कलाविश्वातील ग्लॅमरस दुनियेत वावरत असताना प्रत्येक कलाकार त्याच्या सौंदर्याकडे, पर्सनालिटीकडे विशेष लक्ष देत असतो. कलाविश्वात टॅलेंटसह सौंदर्यालाही तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे खासकरुन अभिनेत्री तर त्यांचा फिटनेस आणि सौंदर्याकडे कटाक्षाने लक्ष देतात. परंतु, एका लोकप्रिय अभिनेत्री या सगळ्याकडे दुर्लक्ष करत केवळ आपल्या पतीचा विचार करुन संपूर्ण केस कापले. सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्रीची चर्चा रंगली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिप्ती ध्यानी (deepti dhyani) साऱ्यांनाच ठावूक असेल. आजवर अनेक मालिकांमध्ये झळकलेल्या दिप्तीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्यानंतर तिने संपूर्ण मुंडण केलं आहे.
दिप्तीचे पती अभिनेता सूरज थापर कोरोना काळात प्रचंड आजारी पडला होता. परिणामी त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सूरजची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी दिप्तीने तिरुपती बालाजीला नवस केला होता. त्यानुसार, सुरजच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिने मुंडण करेन असं म्हटलं होतं. सुदैवाने सुरजच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ज्यामुळे दिप्तीने तिचा नवस पूर्ण केला.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सूरजने इन्स्टाग्रामवर दिप्तीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिचे केस असलेला लूक आणि त्यानंतर मुंडण केलेला लूक असे दोन्ही लूक दिसून येत आहेत. तसंच याविषयी त्याने एका मुलाखतीतही भाष्य केलं आहे.
"मी लिलावती हॉस्पिटलमधून घरी परतलो त्यावेळी दिप्तीने मला तिच्या नवस करण्याविषयी सांगितलं. तेचं हे ऐकून मी काही काळासाठी स्तब्ध झालो होतो. मी वारंवार तिला एकच विचारत होतो. की, खरंच तुला सगळे केस कापावे लागतील का? पण, तिच्या बोलण्यातून एक जाणवत होतं ती या निर्णयावर ठाम होती. दिप्तीने मला माझ्या पायांवर उभं करणं ही त्यावेळी दिप्तीची प्रायोरिटी होती. तिने मला एकच वाक्य सांगितलं. माझ्या केसांपेक्षा तुझं आयुष्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे", असं सूरज म्हणाला.
दरम्यान, सूरजच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दिप्तीने तिरुपतीला जाऊन तिचं मुंडन केलं. दिप्तीनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या केस कापल्याचा फोटो शेअर केला. तसंच 'तेरे नाम सूरज थापर', असं कॅप्शनही तिने दिलं.