या मालिकेच्या सेटवर डेंग्युने घातले थैमान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 05:58 PM2016-11-15T17:58:47+5:302016-11-15T17:58:47+5:30
डेंग्युची साथ सध्या सगळीकडेच पसरली आहे. सामान्यांप्रमाणे अनेक कलाकारदेखील या डेंग्युच्या साथीला बळी पडले आहेत. नामकरण या मालिकेच्या सेटवर ...
ड ंग्युची साथ सध्या सगळीकडेच पसरली आहे. सामान्यांप्रमाणे अनेक कलाकारदेखील या डेंग्युच्या साथीला बळी पडले आहेत. नामकरण या मालिकेच्या सेटवर तर अनेकजणांना डेंग्यू झाला आहे. ही मालिका आठवड्यातील सातही दिवस प्रसारित होत असल्याने या मालिकेच्या टीमला एकही दिवस आराम न करता या मालिकेचे चित्रीकरण करावे लागते. कलाकार दिवसातील कित्येक तास चित्रीकरण करत असल्याने अनेकवेळा याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. या मालिकेतील बरखा बिष्ट, विराफ फिरोज पटेल, सयंती घोष आणि चिमुरडी आर्शीन हे सगळेच तापाने फणफणले आहेत. या सगळ्यांनाच डेंग्यु झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. आर्शीनला तर ताप असला तरी चित्रीकरण करण्यासोबतच अभ्यासही करावा लागत आहे. कारण काहीच दिवसांत तिची परीक्षा सुरू होणार आहे. आर्शीन मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने तिला रोज शाळेत जाणे जमत नाही. पण ती स्काइपच्या मदतीने तिच्या शिक्षकांच्या संपर्कात असते आणि रोजचा अभ्यास पूर्ण करते. पण तापामुळे तिच्यात पुस्तक उचलण्याचीदेखील शक्ती उरलेली नाहीये. मालिकेचे इतर कलाकारदेखील औषधे घेऊन चित्रीकरण करत आहेत. याविषयी आर्शीन सांगते, "गेले दहा दिवस मी आणि माझ्या टीममधील अनेक जण तापाने फणफणलेलो आहोत. आम्हाला सगळ्यांनाच अशक्तपणा आला आहे. मालिकेचे प्रसारण दररोज असल्याने आम्हाला आठवड्यातील जास्तीत जास्त दिवस चित्रीकरण करावे लागते. पण तरीही मालिकेचे निर्माते आम्हाला काही दिवसांचा ब्रेक देत आहेत. तसेच आमची खूप काळजी घेत आहेत."