कलर्सच्या केसरी नंदनमध्ये देष्णा दुगड साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:15 AM2019-04-12T07:15:00+5:302019-04-12T07:15:02+5:30
केसरी नंदन या मालिकेत आता एक नवीन एंट्री होणार आहे. या नव्या पात्रामुळे या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे.
कलर्सची केसरी नंदन ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक प्रेरणादायी कथा पाहायला मिळत असून त्यात केसरी (चाहत तेवानी) नावाच्या एका लहान मुलीचा संघर्ष दाखविण्यात आलेला आहे. कुस्ती हा खेळ खेळण्याचे तिचे स्वप्न आहे, तिचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा हा प्रवास प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत आजवर प्रेक्षकांना केसरीच्या जीवनातील अनेक चढ उतार पाहायला मिळाले आहेत. आता या मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे. या नव्या पात्रामुळे या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना कल्की हे नवे पात्र पाहायला मिळणार असून ही भूमिका देष्णा दुगड ही बालकलाकार साकारणार आहे.
कल्कीचा जन्म हा एका राजघराण्यात झालेला असून तिचे वडील राणाजी (अयाझ खान) तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला तिच्या आई सोबत लंडनला पाठवतात. तिथे शिक्षण घेत असतानाच ती कुस्ताचे धडे देखील गिरवते. ती कुस्ती छान खेळते हे पाहून राणाजींना खूप आनंद होतो आणि ते तिला प्रशिक्षण देण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षक ठरवितात आणि इच्छा व्यक्त करतात की, तिने ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे. त्यांच्या याच इच्छमुळे योग्य वेळ आल्यावर पुढील प्रशिक्षणासाठी आणि टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी कल्कीला परत भारतात बोलावले जाते.
सध्या मालिकेत सुरू असलेल्या कथानकानुसार, केसरीला तिचे शिक्षण आणि कुस्तीचे प्रशिक्षण सुरू ठेवण्यासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. तिचा भाऊ जगतचा (शोएब अली) एक अपघात झाला असून त्यामुळे तो आयुष्यभर चालू शकणार नाही. पण जगत या परिस्थितीत देखील केसरीला पाठिंबा देणार आहे आणि तो तिला धन्वा कुस्ती संघटनेमध्ये घेऊन जाणार आहे.
कल्की या भूमिकेविषयी देष्णा दुगड सांगते, “केसरी नंदन सारख्या शो मध्ये सहभागी होत असल्याचा मला आनंद होत आहे. मुलींनी खेळात सहभागी झाले पाहिजे हे प्रोत्साहन देणारी ही मालिका आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या मालिकेत काम करायला मिळत असल्याने मी प्रचंड खूश आहे.”
देष्णा दुगड म्हणजेच कल्कीच्या प्रवेशाने केसरीचे जीवन कसे बदलणार आहे हे प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना कलर्स वर सोमवार ते शुकवार रात्री 8:30 वाजता पाहायला मिळते.