'अलाद्दिन'मध्ये जिनीला पराभूत करण्यासाठी अम्मी करतेय शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 08:00 PM2019-03-12T20:00:00+5:302019-03-12T20:00:00+5:30
सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन नाम तो सुना होगा' आपल्या लक्षवेधक व रोमांचपूर्ण कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन नाम तो सुना होगा' आपल्या लक्षवेधक व रोमांचपूर्ण कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना बगदादच्या जादुई विश्वाचा अनुभव देणारी मालिका आगामी एपिसोडमध्ये काही अविश्वसनीय वळणे आणि धक्कादायक खुलासे सादर करणार आहे.
बगदाद निवासींना दुष्ट जिन या समस्येचा सामना करावा लागत असताना अम्मी (स्मिता बन्सल) या दुष्ट जिनचा शोध घेऊन त्याचा सर्वनाश करण्याचा निर्धार करते. तिचा दत्तक घेतलेला मुलगा जिनू (राशुल टंडन) हा देखील जिन असतो, याबाबत अनभिज्ञ असलेली अम्मी दुष्ट जिनचा सर्वनाश करण्यासाठी कमिटी तयार करते. दुसरीकडे संतापलेला अंगठीतला जिनी (प्रणित भट्ट) जिनू व त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देतो. अलाद्दिन जिनूला त्याच्यापासून संरक्षण करण्याचे वचन देतो आणि उमर चाचाच्या मदतीसह त्याला प्रशिक्षण देण्याचे ठरवतो. पण वैज्ञानिक असलेले बुलबुल चाचा अंगठीतल्या जिनीचा सर्वनाश
करण्यासाठी एक उपाय आणत मदतीस धावून येतात. हे सर्व घडत असताना अम्मी जिनला पकडण्यावर लक्ष केंद्रित करते आणि तिला यश मिळते, ज्यामुळे जिनू देखील घाबरून जातो.
अम्मीला जिनूचे सत्य समजेल का की अलाद्दिन त्याचे सत्य उघडकीस येण्यापासून त्याला वाचवेल? अलाद्दिनची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्हणाला, 'अलाद्दिन हा काला चोर देखील असल्याने त्याचा अनेक गोष्टींशी संबंध येतो. तसेच त्याच्या जीवनात मेहेर आल्याने तो दुविधेत देखील आहे. जिनू संकटात सापडल्याने अनेक गोंधळ निर्माण झाले आहेत. अलाद्दिन त्याचा भाऊ जिनूला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अलाद्दिन स्वत:हून अनेक संकटांमध्ये सापडत असल्याने तो या स्थितींमधून कशाप्रकारे बाहेर पडतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.'
अम्मीची भूमिका साकारणारी स्मिता बन्सल म्हणाली, 'अम्मीने बगदादमधील जिनला शोधून काढत पकडण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी तिने एक कमिटी तयार केली आहे. पण तिला माहीत नसते की, तिचा स्वत:चा मुलगा जिनू हा देखील एक जिन आहे. आगामी एपिसोड्स प्रेक्षकांसमोर काही धक्कादायक खुलासे करणार आहेत.'
जिनूची भूमिका साकारणारा राशुल टंडन म्हणाला, 'अंगठीतल्या जिनीने बगदादमध्ये थराराचे वातावरण निर्माण केले आहे. यामुळे लोक दुष्ट जिनला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अंगठीतल्या जिनीला पकडण्याचे प्रयत्न केले जात असताना जिनूला अम्मीसमोर त्याचे सत्य उघडकीस येण्याची भिती वाटते. पण अलाद्दिनवर त्याला विश्वास आहे आणि परिस्थिती कशाप्रकारे बदलते हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोचक असणार आहे.'