Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये होणार ACP दिव्या सिंगची एन्ट्री? वाचा काय आहे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 05:13 PM2022-06-10T17:13:41+5:302022-06-10T17:16:17+5:30
Devmanus 2 : ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागात दिव्या बनून नेहाने चाहत्यांना चांगलंच इम्प्रेस केलं होतं. ‘देवमाणूस 2’मध्ये अद्याप तरी नेहाची एन्ट्री झालेली नाही. पण ती येणार, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. याला कारण ठरला तो तिने शेअर केलेला एक फोटो.
झी मराठीची ‘देवमाणूस’ (Devmanus) ही तुफान गाजलेली मराठी मालिका. या मालिकेनं प्रेक्षकांना जणू वेड लावलं होतं. मालिकेची ही लोकप्रियता बघून याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस आला. ‘देवमाणूस 2’मध्ये सर्वच जुने कलाकार आहेत. एक अभिनेत्री मात्र मिसींग आहे. ती म्हणजे, एसीपी दिव्या सिंगची (ACP Divya Singh) भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान (Neha Khan).
‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागात दिव्या बनून नेहाने चाहत्यांना चांगलंच इम्प्रेस केलं होतं. ‘देवमाणूस 2’मध्ये (Devmanus 2) अद्याप तरी नेहाची एन्ट्री झालेली नाही. पण ती येणार, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. याला कारण ठरलाये तो तिने शेअर केलेला एक फोटो. होय, नेहाने खाकी वर्दीतला एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
हा फोटो पाहून ती पुन्हा ‘देवमाणूस’ मध्ये परतणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तुम्हीही ‘देवमाणूस’चे चाहते असाल आणि तिचा हा खाकीतील फोटो पाहून सुखावले असाल तर जरा थांबा. होय, कारण तूर्तास तरी एसीपी दिव्या सिंग मालिकेत परतण्याची चिन्ह नाहीत.
मग नेहाने शेअर केलेला खाकी वर्दीतील फोटो कशासाठी? तर तो तिची आगामी सीरिज ‘सायबर वार’मधील लुक आहे. आजपासून ही सीरिज वूटवर तुम्ही पाहू शकणार आहात.
असा मिळाला पहिला ब्रेक
अभिनयाच्या वेडापायी नेहानं स्वप्नाची नगरी मुंबई गाठायचं ठरवलं. वडील विरोध करणार म्हणून केवळ आईशीच बोलून ऑडिशनसाठी ती मुंबईत यायची. इथे आल्यावर रेल्वेस्टेशनवरील वॉशरूममध्ये ५ रुपये देऊन मेकअप करायची. यात बरेच चांगले वाईट अनुभव तिच्या वाट्याला आले. मुंबईत दरवेळी तिला स्टेशनवरच रात्र काढावी लागत असे. पुढे अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कुलमध्ये तिने प्रवेश मिळवला. एक महिन्याचा कोर्स करत असताना तिथेच असलेल्या अमरजीत या वृद्धव्यक्तीशी तिची ओळख झाली.
वृद्ध असल्याने शरीराची हालचाल मंदावलेल्या अमरजित यांची नेहा मदत करायची. अमरजित यांनी अनेक कलाकारांना घडवलं होतं. त्यांची मुलंदेखील दिग्दर्शक होती. त्यामुळे मी तुला काम मिळवून देतो असं आश्वासन त्यांनी नेहाला दिलं होतं. त्यांनीच नेहाला मुंबईत मालाडला राहण्यासाठी घरही दिलं. जिमी शेरगिल सोबत ‘युवा’ चित्रपटात तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर बॅड गर्ल, काळे धंदे, शिकारी, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बोर्डर्स सारख्या चित्रपटातून तिनं काम केलं.