धर्मेंद्र सांगतात, माझा अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 04:23 PM2018-08-21T16:23:08+5:302018-08-21T16:34:22+5:30
अभिनेते धर्मेंद्र जेव्हा आपला मुलगा बॉबी देओल याच्या सोबत दस का दम मध्ये उपस्थित होईल, तेव्हा कार्यक्रमाची रंजकता आणखीनच वाढणार आहे.
अभिनेते धर्मेंद्र जेव्हा आपला मुलगा बॉबी देओल याच्या सोबत दस का दम मध्ये उपस्थित होईल, तेव्हा कार्यक्रमाची रंजकता आणखीनच वाढणार आहे. सलमान खान या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन आपल्या वेगळ्या अंदाजात करत या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. चित्रपट उद्योगात प्रदीर्घ काळ काम करणार्या कलाकारांपैकी एक धर्मेंद्र या कार्यक्रमात बॉलिवूड चित्रपट उद्योगातील सध्याच्या परिस्थितीबद्दल आपले विचार मांडताना दिसणार आहे.
धर्मेंद्र यांना आपले संघर्षाचे दिवस आठवले आणि त्या तुलनेत आता या उद्योगात प्रवेश मिळवणे अधिक सोपे झाले आहे असे त्यांना वाटते. धर्मेंद्र आपल्या शेतात काम करत असे आणि दररोज ठराविक जागी पोहोचण्यासाठी 100 किमी सायकल चालवून जात असे. त्याने जेव्हा कुरीयर मार्फत आपला पोर्टफोलियो पाठवला होता, तेव्हा काही तरी काम आपल्याला मिळावे अशी मनोमन प्रार्थना ते करत होते. धर्मेद्र यांचा चाहता असलेल्या सलमानने सांगितले, “धरमजी माझे रोल मॉडेल आहेत. मी त्यांच्या अभिनय कौशल्याचे अनुकरण करतो व त्याचमुळे मला अधिक चांगला कलाकार बनण्याची प्रेरणा मिळते.”
धर्मेंद्र यांना आपले करिअर अभिनयात घडवण्यास अनेक वर्षे गेली. ते सांगतात, “तो काळ असा होता, जेव्हा एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याने मला फर्स्ट क्लासचे तिकीट देखील दिले नव्हते व त्यामुळे मला सेकेंड क्लासने प्रवास करून यावे लागले होते. मी सेकेंड क्लासने येईन अशी अपेक्षाच कोणी केली नव्हती त्यामुळे फर्स्ट क्लासमधून आलेल्या कलाकारांना घेऊन ते निघून गेले होते. मी ऑफिसात जाऊन पोहोचलो त्यावेळी माझी बारीक केलेली क्रू कट पाहून त्या दिग्दर्शकाने माझी तुलना जेम्स डीनशी केली होती आणि तेव्हाच माझ्या कारकिर्दीस सुरुवात झाली.”
धर्मेंद्र पुढे म्हणाले, “आज कालचा चित्रपट उद्योग हा भाजी बाजारासारखा झाला आहे. यशस्वी होण्याच्या आशेने आम्ही अगदी लहानशी भूमिका मिळवण्यासाठी देखील खूप खटाटोप करायचो. अनेक अपयशांचा सामना करताना मी स्वतःला सांगितले होते की, “ मला हे आत्ताच केले पाहिजे नाही तर ते कधीच होणार नाही’. आणि याच प्रेरणेने मी प्रयत्न करत राहिलो. अभिनय ही माझी ‘प्रेयसी’ आहे आणि मी आयुष्यात जे केले ते मला मनापासून आवडते.”