कपिल शर्माला कमबॅकसाठी करावी लागली ही तडजोड, मानधनात तब्बल केली इतकी कपात?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 10:46 AM2019-01-08T10:46:37+5:302019-01-08T14:26:14+5:30
कपिलने आता द कपिल शर्मा शोद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या कार्यक्रमाचा निर्माता बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आहे. कपिल शर्मा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच वादात अडकला होता. त्यामुळे त्याच्यासाठी त्याचा कमबॅक हा अतिशय महत्त्वाचा आहे
कपिल शर्मा हा एक-दोन वर्षांपूर्वी टेलिव्हिजनचा एक मोठा स्टार होता. त्याचा द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम नेहमीच टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल असायचा. त्याच्या या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज देखील हजेरी लावायचे. कपिल शर्माला द ग्रेट इंडियन चाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाच्या अनेक सिझनचे विजेतेपद त्याने मिळवले. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाने तर त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. त्यानंतर त्याचा द कपिल शर्मा शो देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला. पण कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांची भांडणं झाल्यानंतर सुनील, अली असगर यांसारख्या कलाकारांनी या कार्यक्रमाला रामराम ठोकला आणि या कार्यक्रमाला उतरती कळा लागली. सततच्या आजारपणामुळे कपिल अनेकवेळा या कार्यक्रमाचे चित्रीकरण ऐनवेळी रद्द करत होता. त्यामुळे हा कार्यक्रम काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतला होता. या सगळ्या कारणामुळे कपिलची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत गेली.
कपिलने आता द कपिल शर्मा शोद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या कार्यक्रमाचा निर्माता बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आहे. कपिल शर्मा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच वादात अडकला होता. त्यामुळे त्याच्यासाठी त्याचा कमबॅक हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे कपिलने कमबॅक करण्यासाठी त्याच्या मानधनात प्रचंड कपात केली असल्याची चर्चा आहे. कपिल पूर्वी एका भागासाठी जवळजवळ ६०-७० लाख रुपये घेत असे. पण आता कपिल एका भागासाठी केवळ २० लाख इतकेच मानधन घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
कपिलने त्याच्या मानधनात इतकी कपात केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण कपिलने मानधनात कपात केली नसल्याचे त्याचा सहकलाकार कृष्णा अभिषेकचे म्हणणे आहे. याविषयी बॉलिवूडलाइफशी बोलताना त्याने सांगितले, कपिलने मानधनात कपात केली हे चुकीचे आहे. आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमात काम करण्यासाठी खूप चांगला पैसा मिळत असून आम्ही सगळे आनंदाने काम करत आहोत आणि काम हे सगळ्यात महत्त्वाचे असते. पैसा हा दुय्यम आहे असे मला वाटते.