अभिनेत्री सेजल शर्माने केली आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये लिहिले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 14:17 IST2020-01-25T14:15:27+5:302020-01-25T14:17:37+5:30
सेजलने दिल तो हॅपी है जी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री सेजल शर्माने केली आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये लिहिले कारण
कुशल पंजाबीच्या आत्महत्येला एक महिनाही उलटला नसताना छोट्या पडद्यावरील आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माने तिच्या राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सेजल मीरा रोड येथे तिच्या दोन रूम मेट सोबत राहात होती.
काशमिरा पोलिस स्थानकात सेजलच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिच्या खोलीत राहाणाऱ्या दोन मुलींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पाच वाजता पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सेजलला पाहाण्यात आले. सेजलच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट सापडली असून तिने यात आत्महत्येमागचे कारण लिहिले आहे. तिच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरविले जाऊ नये असे तिने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. सेजल ही केवळ 26 वर्षांची होती. तिने स्टार प्लसवरील दिल तो हॅपी है जी या मालिकेत काम केले होते.
मीरा रोड येथील शिवार गार्डन परिसरातील रॉयल नेस्ट हाऊसिंग सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर गेल्या काही महिन्यांपासून सेजल भाड्यावर राहात होती. दिल तो हॅपी है जी ही तिची मालिका जानेवारी 2019 ला सुरू झाली होती. पण अचानक ऑगस्टला ही मालिका बंद करण्यात आली. या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. तिच्या काही मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, मालिका बंद झाल्यानंतर सेजल प्रचंड तणावाखाली होती. ती गेल्या काही महिन्यांपासून काम शोधत होती. पण काही केल्या तिला काम मिळत नसल्याने ती निराश झाली होती.
सेजल ही मुळजी राजस्थानमधील उदयपूर येथील होती. अभिनयक्षेत्रात करियर करण्यासाठी 2017 मध्ये ती मुंबईत आली होती. दिल तो हॅपी है जी ही तिची पहिलीच मालिका होती. याआधी तिने काही जाहिरातींमध्ये काम केले होते.