'सलमानला हटवा अन् मला बिग बॉसचा होस्ट करा'; Dino Morea ने दिली शोला ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 15:53 IST2023-04-07T15:52:44+5:302023-04-07T15:53:29+5:30
Dino morea: सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस हा कार्यक्रम माझ्या ताब्यात द्या असं त्याने म्हटलं आहे.

'सलमानला हटवा अन् मला बिग बॉसचा होस्ट करा'; Dino Morea ने दिली शोला ऑफर?
अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) आठवतोय का तुम्हाला? राज सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारुन तो विशेष लोकप्रिय झाला. डिनो मोरियानेसिनेमा ते वेब सीरिज अशा प्रत्येक माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, आता त्याने चक्क छोट्या पडद्यावर काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस हा कार्यक्रम माझ्या ताब्यात द्या असंही त्याने म्हटलं आहे.
अलिकडेच डिनो मोरियाने 'इ टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बिग बॉस या शोविषयी भाष्य केलं. "मला दरवर्षी बिग बॉस या शोची ऑफर येते. मात्र, या शोसाठी माझ्याकडे वेळ नव्हता. त्यावेळी मी तीन वेगवेगळ्या सिनेमांमध्ये बिझी होतो. त्यामुळे माझ्याकडे तारखा उपलब्ध नव्हत्या. दुसरी गोष्ट, मी ४ महिने एकाच घरात राहू शकत नाही. जर मी २० वर्षाचा असतो तर एक वेळ मी गेलो सुद्धा असतो. पण, मी वयाच्या अशा टप्प्यावर उभा आहे जेथे मी स्वत:ला अशा पद्धतीने लॉक करुन घेऊ शकत नाही", असं डिनो म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "जर तुम्ही मला सलमान करत असलेलं काम देत असाल तर मी नक्कीच या शोचा विचार करेन. मी बिग बॉसचा शो रनर होईन. मी नक्कीच चांगल्या प्रकारे काम करेन. हा सलमान खान ते काम चांगल्या पद्धतीने करतच आहेत. आणि, मला ते आवडतंदेखील."
दरम्यान, डिनो मोरिया याने १९९९मध्ये 'प्यार में कभी कभी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'राज', 'गुनाह', 'चेहरा', 'अकसर' आणि 'फाइट क्लब' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, 'हॉस्टेजेस', 'तांडव', 'द एम्पायर' आणि 'हेलमेट' या वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे.