मुंबई: घड्याळाच्या काट्यावर धावणारं शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 07:33 AM2022-07-17T07:33:11+5:302022-07-17T07:34:57+5:30
मुंबई हे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लोकांचं शहर आहे.
- स्वप्ना वाघमारे-जोशी, दिग्दर्शिका
२९ सप्टेंबर १९८९ हा दिवस माझ्या आयुष्यात फार अमूलाग्र बदल घडवणारा ठरला. या दिवशी मी मुंबईत येऊन लगेच पहिल्याच दिवशी एका मालिकेची सहायक दिग्दर्शिका म्हणून रुजू झाले होते आणि दिग्दर्शक होते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी राजदत्त. माझ्यासाठी हा फार मोठा सुखद धक्का होता. माझी मैत्रीण नीलकांती पाटेकर ‘मन वढाय वढाय’, या मालिकेची निर्माती होती आणि तिच्या बोलावण्यावरून मी बडोद्याहून मुंबईत आले होते.
पहिल्याच दिवशी रात्री २ वाजेपर्यंत चित्रीकरण सुरू होतं. माझ्यासाठी तो एक वेगळाच अनुभव होता. त्यापूर्वी मी बडोद्यात महाराजा सयाजीराव विद्यापीठातून नाट्यशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला होता. भाषाशास्त्रात पदवी घेतली होती. अहमदाबाद दूरदर्शनवर निर्मिती सहायक म्हणून काम केले होते. पण थेट राजदत्तजींच्या हाताखाली काम केल्याने एक प्रगल्भ दिग्दर्शिका होण्यासाठी लागणारी बरीच साधनसामग्री मला तिथे केवळ निरीक्षणातून मिळत होती.
यापूर्वी मी मुंबईत केवळ कुठेतरी जाताना वाटेत विसाव्याचा थांबा असतो, तशी आले होते. माझ्यासाठी हे कायमच ‘एवढं मोठ्ठं शहर’ असायचं. इथे आल्या आल्या मी एका नातेवाइकांकडे सांताक्रुझला तात्पुरती काही दिवस राहिले आणि मग लगेचच पार्ल्याला पेइंग गेस्ट म्हणून शिफ्ट झाले. दैनंदिन प्रवासाच्या बाबतीत मी खूपच नशीबवान होते. आमच्या युनिटमधले सहकारी बी. पी. सिंग जवळच राहत असल्याने मला जवळपास रोजच पिक अप आणि ड्रॉप मिळत होता. अन्यथा मला मुंबईतले रस्ते तेव्हाच काय अजूनही कळत नाहीत. ट्रेनच्या प्रवासाचा कदाचित मला धसका असावा, कारण मी आजवर शक्यतो ट्रेनचा प्रवास टाळण्यात यशस्वी झाले आहे. पूर्वी बसने प्रवास करायचे आणि आता स्वतःच्या गाडीने करते. पण बसमधनं उतरले तरी पूर्वी मला रस्ता क्रॉस करायला बराच अवधी लागायचा. कारण ट्रॅफिक थांबल्याशिवाय रस्ता ओलांडायची हिम्मतच होत नसे.
मुंबई हे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लोकांचं शहर आहे. काळ काम वेगाचं गणित ज्याला जमलं तो इथे यशस्वी होतो. मी हेच गणित फार पटकन आत्मसात केलं. फार लांब लांबहून माणसं कामाला वेळेवर पोहोचतात, हे मी पक्कं लक्षात ठेवलं. मला इथे खूप छान माणसं भेटली. अन्यथा मी तशी घाबरट आहे. पण माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून काम करणारे सगळे इतके सज्जन लोक भेटले, मित्र झाले, त्यामुळे मला कधीच काही अडचण आली नाही. आता मी पक्की मुंबईकर झाले आहे. ग्रीन कार्ड होल्डर म्हणा नं!
- शब्दांकन : तुषार श्रोत्री