अशोक सराफ यांच्या 'फेकाफेकी' सिनेमातली ही अभिनेत्री आठवते का?, सध्या झळकतेय 'तू चाल पुढं' मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 03:19 PM2023-08-16T15:19:56+5:302023-08-16T15:21:22+5:30
'फेकाफेकी'मधील या अभिनेत्रीनं बऱ्याच प्रतीक्षेनंतर अग्गंबाई सासूबाई या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले होते.
नव्वदच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde ) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) या मराठी चित्रपटसृष्टीतील जोडीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या जोडीने एकत्र केलेले चित्रपट सुपरडुपर हिट ठरले आहेत. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावायची. त्यांचे चित्रपटांना आजही प्रेक्षक तेवढ्याच आवडीने पाहत असतात. या दोघांचा एक धमाल विनोदी चित्रपट म्हणजे फेकाफेकी. पत्नीच्या संशयी स्वभावामुळे अशोक सराफ यांना थापा मारण्याची सवय लागलेली असते. अशातच अँथनी गोंसाळविस या नावाच्या व्यक्तीचा ते मित्र म्हणून उल्लेख करतात. तो कुठे राहतो काय करतो याचीही थाप मारली जाते. पण प्रत्यक्षात त्या नावाची व्यक्ती सापडते आणि त्यामुळे उडणारा गोंधळ प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवतो. याच चित्रपटात अँथनी गोंसाळवीस हे पात्र चेतन दळवी यांनी साकारलेले आहे तर त्यांच्या पत्नीची रोजी गोंसाळवीसची भूमिका अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर (Pratibha Goregaonkar) यांनी साकारली आहे. प्रतिभा गोरेगावकर सध्या तू चाल पुढं या मालिकेत काम करत आहेत. त्यांनी या मालिकेत अश्विनीच्या सासूबाईंची भूमिका साकारली आहे.
प्रतिभा गोरेगावकर या मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून प्रतिभा गोरेगावकर मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. आता सध्या त्या झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत अश्विनीच्या सासूबाईंची भूमिका साकारत आहेत. फेका फेकी या चित्रपटाव्यतिरिक्त प्रतिभा गोरेगावकर यांनी झुंज तुझी माझी, सीआयडी, सत्ता, मन में विश्वास है, नेल पॉलिश अशा चित्रपटातून काम केले आहे.
झी मराठीच्या अग्गंबाई सासूबाई या मालिकेतून त्यांनी बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले होते. या मालिकेत त्या एका विनोदी भूमिकेत दिसल्या होत्या. साथ निभाना साथिया, सावधान इंडिया अशा हिंदी मालिकेतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. फेका फेकी या चित्रपटात त्यांची भूमिका एका खास अंदाजात त्यांनी साकारली होती त्यामुळे अश्विनीच्या सासूबाई ह्याच का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. अर्थात फेका फेकी चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३४ वर्ष लोटली आहेत. त्यामुळे त्यांना आता अशा गेटअपमध्ये ओळखणे थोडे कठीण जात आहे.