'डॉक्टर डॉन' मालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा, सेटवर दणक्यात झाले सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 03:57 PM2021-01-27T15:57:43+5:302021-01-27T16:00:34+5:30
"डॉक्टर डॉन या मालिकेला जवळपास १ वर्ष पूर्ण झालंय आणि मालिकेने २०० भागांचा टप्पा देखील गाठला. हे सगळं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे.
छोट्या पडद्यावरील रसिकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'डॉक्टर डॉन'. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. मालिकेचे कथानकही तितकंच रंजक असून देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावली आहे. 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून या कलाकारांचेही छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले आहे.
अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे नुकतंच या मालिकेने २०० भागांचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने हा यशस्वी माईलस्टोन गाठला असं मालिकेचा प्रमुख अभिनेता देवदत्त नागे याचं म्हणणं आहे. सेटवर केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.
या आनंदाच्या क्षणी देवा म्हणजे अभिनेता देवदत्त नागे म्हणाला, "डॉक्टर डॉन या मालिकेला जवळपास १ वर्ष पूर्ण झालंय आणि मालिकेने २०० भागांचा टप्पा देखील गाठला. हे सगळं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमचे आणि प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानतो.
प्रेक्षक वेळात वेळ काढून आम्हाला रोज टीव्ही स्क्रीनवर बघतात आणि आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही कलाकार टीव्हीवर दिसतो पण प्रत्येक भाग तुमच्यासमोर सादर करण्यासाठी पडद्यामागे खूप मोठी टीम कार्यरत आहे या संपूर्ण टीमचे देखील मी अभिनंदन करतो. प्रेक्षक या पुढेही आमच्यावर असाच प्रेम करत राहतील याची मला खात्री आहे."