दारूच्या धुंदीत दिग्दर्शकाच्या कारने जमावाला चिरडलं, १ जण ठार, ८ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:30 IST2025-04-07T12:28:47+5:302025-04-07T12:30:45+5:30
या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर जवळपास आठ जण गंभीर जखमी झाले.

दारूच्या धुंदीत दिग्दर्शकाच्या कारने जमावाला चिरडलं, १ जण ठार, ८ जण गंभीर जखमी
Kolkata: पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील ठाकूरपुकूर बाजार परिसरात रविवारी (६ एप्रिल) अत्यंत भयानक घटना घडली. दारुच्या नशेत (Drunk And Drive) एका दिग्दर्शकाच्या कारने जमावाला (Drunk Film Director Crashes Car Into Kolkata Market) चिरडलं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना गाडीतून दारूच्या काही बाटल्या सापडल्या असून अपघाताच्या वेळीही सिद्धांत दारुच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालंय.
सिद्धांत दास असं त्या दिग्दर्शकाचं नाव असून अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत एका प्रसिद्ध बंगाली वाहिनीचा कार्यकारी निर्माती श्रिया बासू उपस्थित होती. सिद्धांत दास उर्फ विकटो याला ठाकूरपुकूर पोलिसांनी अटक केली. 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री कोलकातामधील साऊथ सिटी मॉलमध्ये मालिकेचं यश साजरं करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत पार्टी सुरू होती.
या पार्टीत अनेकांनी मद्यपान केलं आणि रात्री जवळपास २ वाजताच्या सुमारास सर्वजण आपापल्या घरी निघाले. त्याचवेळी सिद्धांत दास आणि श्रिया बासू हे दारुच्या नशेतच कारने शहरात फिरत होते. रविवारी सकाळी त्यांच्या कारने बॅरिकेड्स तोडून गर्दीच्या बाजारात प्रवेश केला आणि अनेकांना धडक दिली. हे सर्व काही क्षणात घडलं.
या अपघातात ६३ वर्षीय भाजी विक्रेते अमीनुर रहमान यांचा मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. या घटनेत ६८ वर्षीय जॉयदेब मजुमदार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून ते आयुष्याशी झुंज देत आहेत. तर अपघातात जखमी झालेल्या इतर ७ जणांना रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. या अपघातात अनेक दुकानदारांच्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे संपूर्ण ठाकूरपुकूर परिसर हादरला.