"पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक 'कलाच' आहे", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:21 AM2024-07-16T10:21:27+5:302024-07-16T10:22:13+5:30
Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके सातत्याने चर्चेत येत असतो. कधी त्याच्या प्रोजेक्टमुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे.
अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सातत्याने चर्चेत येत असतो. कधी त्याच्या प्रोजेक्टमुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे. ज्या प्रमाणे तो छोट्या पडद्यावर रसिकांना खळखळून हसवत असतो. तसाच तो सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट शेअर करतो. दरम्यान आता त्याने एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, आपलं स्वतःचं घर झालं की त्यातली एक खोली आपण “कलेसाठी” समर्पित करायची , जिथे “कलेची” जोपासना झाली पाहिजे . हे आमच्या दोघांचंही स्वप्न होतं , आणि आज एका छोट्याश्या डिस्कशन नंतर माझ्या बायकोने मला पटवून दिलं की पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक “कलाच” आहे. आम्ही प्रेमाने घेतलेल्या घराच्या “खोलीचा” पुरेपूर वापर झाल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर आहे.
त्याने पुढे लिहिले की, अजूनही माझ्या प्रेमात किती “खोली” आहे हे मी हिला दाखवलं असतं.... पण जाऊदे.. पावसाळा आहे आणि वॉशिंग मशीनला कपड्यांचा एक लॉट अजून लावलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पावसाळ्यात अन्न, वस्त्र, नि वारा होऊन बसतात. असा नवीन शोध आज मला लागला.
तळटीप- आमच्या त्या छोट्याश्या डिस्कशन नंतर माझ्या असं लक्षात आलंय की कथ्थक नाचणाऱ्या मुलींचा पाया आणि पाय दोन्ही खूप strong असतात. आता माझी कंबर बरी आहे काळजी नसावी. :- सुकून, असेही त्याने म्हटले आहे.