'अजून किलोभर माती खा'; 'बिग बॉस ३'च्या महिला स्पर्धकांवर मेधा घाडे संतापली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 01:36 PM2021-10-10T13:36:06+5:302021-10-10T13:37:09+5:30
Bigg boss marathi 3:प्रेक्षकांसोबतच आता सेलिब्रिटींकडूनही या पर्वावर आणि त्यातील स्पर्धकांवर टीकास्त्र डागलं जात आहे.
अलिकडेच छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठीचं तिसरं (bigg boss marathi 3) पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मात्र, हे पर्व म्हणावं तितकं प्रेक्षकांना भावलेलं नाही. घरात रंगणारे वेगवेगळे टास्क आणि त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये निर्माण होणारे वाद यामुळे प्रेक्षकांचं जरी मनोरंजन होत असलं तरीदेखील अनेकदा त्यांच्या अनफेअर खेळण्यामुळे प्रेक्षकांमधून नाराजी उमटत आहे. त्यामुळे अनेकदा या पर्वावर टीकादेखील होत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे प्रेक्षकांसोबतच आता सेलिब्रिटींकडूनही या पर्वावर आणि त्यातील स्पर्धकांवर टीकास्त्र डागलं जात आहे. अलिकडेच बिग बॉस मराठीची पहिली विजेती मेघा धाडे (megha dhade) हिने तिसऱ्या पर्वातील स्पर्धकांवर टीकास्त्र डागलं आहे. 'किलोभर माती खा', असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केली आहे.
शनिवारी झालेल्या बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी स्नेहा आणि सुरेखाची शाळा घेतली. घरातील कॅप्टन ठरवताना या दोघींच्या एका मतामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे महेश मांजरेकरांनी त्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. कलर्स मराठीने या एपिसोडचा प्रोमो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला होता. हा प्रोमो पाहिल्यावर नेटकऱ्यांसोबतच मेघानेदेखील तिची नाराजी व्यक्त करत यंदाच्या पर्वात स्पर्धक कसे चुकीच्या पद्धतीने खेळत आहेत हे सांगितलं आहे.
"मुलींनो, खा माती अजून किलो किलोभर. लास्ट टाइम दादूसच्या वेळी पण कॅप्टन होऊ दिला नाही आणि आता पुन्हा तोच वेडेपणा चाललाय या सगळ्या पोरींचा. फक्त मिनल उत्तम प्रकारे खेळत आहे आणि तृप्ती देसाईदेखील पारदर्शकपणे खेळताना दिसतायेत. बाकी सगळ्या अजूनही चाचपडतायेत.... कधी नीट खेळतील देवच जाणो", अशी कमेंट मेघाने केली आहे.
दरम्यान, अनेकदा बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात घरात कॅप्टन्सीवरुन विविध वाद रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. यात अनेकदा काही महिला स्पर्धकांनी त्यांच्या हातात असतानादेखील योग्य कॅप्टनची निवड केली नाही. त्यामुळे प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यातच मेघाने या सीझनवर कमेंट केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष मेघाकडे वेधलं आहे. मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती आहे. तिच्यानंतर शिव ठाकरेने बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व गाजवलं होतं. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोण विजेता होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.