२ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर 'बिग बॉस' फेम कपल झालं विभक्त; ५ महिन्यांपूर्वीच ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 13:13 IST2024-02-13T13:12:23+5:302024-02-13T13:13:38+5:30
एजाज खान आणि पवित्रा पुनियाचं २ दोन वर्षांच्या डेटिंगनंतर ब्रेकअप

२ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर 'बिग बॉस' फेम कपल झालं विभक्त; ५ महिन्यांपूर्वीच ब्रेकअप
'बिग बॉस १४'मधून पवित्रा पुनिया आणि एजाज खान ही जोडी घराघरात पोहोचली. 'बिग बॉस'च्या घरातील त्यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय होता. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांच्यात प्रेमाचे सूर जुळले होते. त्यांनी एकमेकांना प्रपोजही केलं होतं. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णयही घेतला होता. पण, आता दोन वर्षांनंतर ते वेगळे झाले आहेत.
पवित्रा पुनिया आणि एजाज खान ही टीव्हीवरील लोकप्रिय जोडी आहे. अनेकदा पवित्रा आणि एजाज सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसायचे. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा होत्या. बऱ्याच दिवसांपासून ते एकत्र दिसले नाहीत. एकमेकांबरोबरचे फोटो पोस्ट करणंही त्यांनी बंद केलं होतं. त्यामुळे त्यांच्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. आता अभिनेत्रीने याबाबत मौन सोडत त्यांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं आहे.
'ईटाइम्स'शी बोलताना पवित्रा पुनियाने एजाज आणि ती आता एकत्र राहत नसल्याचा खुलासा केला आहे. याबरोबरच ५ महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झाल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं आहे. मालाडमधील एका फ्लॅटमध्ये ते दोघेही एकत्र राहायचे. पण, ब्रेकअप झाल्यानंतर आता एजाजने तो फ्लॅट सोडला आहे. तर पवित्रा पुनिया तिथे एकटीच राहते.
एजाजबरोबरच्या ब्रेकअपनंतर पवित्रा पुनिया म्हणाली, "प्रत्येक गोष्टीचा एक मर्यादित काळ असतो. आयुष्यात कोणतीच गोष्ट पर्मनंट नसते. नात्यांबाबतही असंच आहे. एजाज आणि मी काही महिन्यांआधीच वेगळे झालो आहोत. मी त्याचा आदर करते. आमचं नातं टिकलं नाही. पण, त्याच्याबरोबर नेहमीच चांगलं व्हावं असंच मला वाटतं."