एका फोनमुळे एल्विश यादव अडकला! सापाच्या विषासह रेव्ह पार्टीवर पोलिसांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:52 PM2023-11-03T13:52:16+5:302023-11-03T13:52:46+5:30
आज नोएडा पोलिसांनी मोठ्या रेव्हपार्टीचा भांडाफोड केला.
आज नोएडा पोलिसांनी मोठ्या रेव्हपार्टीचा भांडाफोड केला. या प्रकरणी बिगबॉस विजेता आणि प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादवचे नावही समोर आले आहे. यापार्टीत परदेशी मुली होत्या आणि नशेसाठी विषारी सापांच्या विषाचा नशेसाठी वापर केला जात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. एल्विश यादवने परदेशी मुलींसोबत रेव्ह पार्टी केली होती आणि या पार्टीत कोब्रा सापाच्या विषाचा वापर नशेसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या ६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आता एल्विश यादव अडकला आहे.
भाजपाचं OBC कार्ड?; १० राज्यांच्या नेत्यांसोबत अमित शाहांची मध्यरात्रीपर्यंत बैठक
नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाच्या विषाचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या एफआयआरमध्ये ६ जणांची नावे नोंदवली असून त्यात एल्विश यादवचे नावही एफआयआरमध्ये आहे. हे लोक पार्ट्यांमध्ये विष पुरवण्यासाठी मोठी रक्कम घेत असल्याचा आरोप आहे. सध्या वनविभागाने सहा तस्करांना अटक केली आहे. एल्विश यादवला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एल्विश यादवला नोटीस बजावण्यात येणार असून त्यानंतर काही कारवाई केली जाईल.
पोलिसांनी या छाप्यात रेव्ह पार्टीतून ९ विषारी सापही जप्त केले आहेत. आरोपींकडून २० ते २५ एमएल नशेचे विषही जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या सापांमध्ये पाच कोब्रा, दोन दोन तोंड असलेले साप, एक लाल नाग आणि अजगराचा समावेश आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सेक्टर ५१ सॅफरॉन वेंडिंग व्हिला येथे छापा टाकला होता, त्यानंतर या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला. वनविभाग आणि पोलिसांनी मिळून हा छापा टाकला. वनविभागाने वनजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण पोलिस स्टेशन सेक्टर ४९ परिसरातील आहे.
नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात पीएफए संस्थेचे पशु कल्याण अधिकारी गौरव गुप्ता यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये गौरव गुप्ता यांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आम्हाला माहिती मिळाली होती की एल्विश यादव नावाचा एक व्यक्ती त्याच्या टोळीतील इतर सदस्यांसह नोएडा आणि एनसीआरच्या शेतात सापाचे विष आणि जिवंत सापांचे व्हिडिओ यूट्यूबवर शूट करतो. आणि ते बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्या आयोजित करतात, यामध्ये परदेशी मुलींना आमंत्रित केले जाते आणि ते सापाचे विष आणि मादक पदार्थांचे सेवन करतात.
दरम्यान, या कारवाईवेळी पोलिसांना त्यांची झडती घेतली असता राहुलच्या कमरेला असलेल्या निळ्या रंगाच्या पिशवीत प्लास्टिकच्या बाटलीत भरलेले सुमारे २० मिली सापाचे विष आढळून आले असून त्यांच्याकडून पाच कोब्रा साप, एक अजगर, २ दोन असे एकूण ९ साप जप्त करण्यात आले आहेत.
एल्विश यादवने आरोप फेटाळले
संपूर्ण प्रकरणावर आता एल्विशची प्रतिक्रिया समोर आली आहे. एल्विशने त्याच्या ट्वीटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्याविरोधात सध्या अनेक गोष्टी पसरवल्या जात आहेत. एल्विश यादवला अटक केल्याच्या बातम्याही माझ्यापर्यंत आल्या आहेत. नशेच्या पदार्थांबरोबर एल्विशला पकडलं गेल्याचंही बोललं जात आहे. माझ्याबद्दल पसरणाऱ्या या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसून त्या खोट्या आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. यामध्ये एक टक्काही सत्य नाही. मी उत्तर प्रदेश पोलिसांना सहकार्य करेन. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांना मला सांगायचं आहे की यामध्ये मी सहभागी असेन, तर मला शिक्षेसाठी तयार आहे. पण, मीडियाने माझं नाव खराब करू नये." असं एल्विश म्हणाला.