'पिरतीचा वनवा उरी पेटला'मध्ये उत्कंठावर्धक वळण; सावी खेळणार मास्टरमाईंड गेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 17:42 IST2024-05-16T17:42:08+5:302024-05-16T17:42:40+5:30
Pirticha vanva uri petla: विद्याधर दादांचं सत्य अर्जुनला कळलं होतं त्यामुळे त्याची हत्या करण्यात येते. मात्र, ही गोष्ट कोणालाही ठावूक नसून घरात सध्या अर्जुन सारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती वावरत आहे.

'पिरतीचा वनवा उरी पेटला'मध्ये उत्कंठावर्धक वळण; सावी खेळणार मास्टरमाईंड गेम
कलर्स मराठीवरील 'पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. या मालिकेमध्ये आतापर्यंत अर्जुन आणि सावीवर अनेक संकटं आली पण त्यांनी त्या प्रत्येक संकटाला मिळून सडेतोड उत्तरं दिली. सावीने प्रत्येक कठीण परिस्थितीत अर्जुनची साथ दिली आहे. अशातच आता या मालिकेने उत्कंठावर्धक वळण येणार आहे.
विद्याधर दादांचं सत्य अर्जुनला कळलं होतं त्यामुळे त्याची हत्या करण्यात येते. मात्र, ही गोष्ट कोणालाही ठावूक नाही. घरात अर्जुन सारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती वावरत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला भीमा सदनात आणण्यामागे विश्वंभर मामांचा हात असल्याचं दिसून येत आहे. मात्र, त्या व्यक्तीला घरात आणण्यामागे सावीचाच हात असून हा तिच्या मास्टरमाइंड खेळाचा एक भाग आहे.
कलर्स मराठीने या मालिकेचा एक प्रोमो नुकताच रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुनच्या तोतयाला घरात आणण्यामागे सावीचा हात असून या कामासाठी तिने त्याला ५० लाख रुपये दिल्याचं दिसून येत आहे. परंतु, शत्रूला त्यांच्याच खेळात मात देण्यासाठी तिने या तोतया अर्जुनला घरात आणलं आहे.
दरम्यान, सावीच या सगळ्या प्लॅनची मास्टरमाईंड आहे. हा बनावट अर्जुन कुठे आणि कसा भेटला सावीला? काय असेल त्याला घरात आणण्यामागचा सावीचा प्लॅन ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता प्रेक्षकांना येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळतील.