Exclusive : "मी किशोरी अंबियेंची मुलगी नाही", 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण
By कोमल खांबे | Published: March 26, 2024 02:56 PM2024-03-26T14:56:43+5:302024-03-26T14:58:00+5:30
काही दिवसांपूर्वी काजलने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्याबरोबरचा फोटो शेअर केलाया फो होता. त्यामुळे काजल किशोरी अंबियेंची लेक आहे की काय, असा संभ्रम चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. याबाबत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत काजलने स्पष्टीकरण दिलं आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे काजल पाटील. या मालिकेत मानसी हे पात्र साकारून काजलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. काजल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच ती अनेकदा फोटो आणि व्हिडिओही शेअर करताना दिसते. काजलने 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अभिनयातील प्रवास आणि कलाविश्वाबद्दल भाष्य केलं. याबरोबर किशोरी अंबिये यांची मुलगी नसल्याचा खुलासाही काजलने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
काही दिवसांपूर्वी काजलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनमध्ये किशोरी अंबिये यांना आई म्हटलं होतं. त्यामुळे काजल किशोरी अंबियेंची लेक आहे की काय, असा संभ्रम चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. याबाबत आता काजलने स्पष्टिकरण दिलं आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "'कुलस्वामिनी' या माझ्या पहिल्या मालिकेत किशोरी अंबिये माझ्या ऑनस्क्रीन आई होत्या. किशूताई ही माझी आईच आहे. मी नवीन असल्याने तिने मला अनेक गोष्टी सांगितल्या. मी मुळची पुण्याची आहे. त्यामुळे मुंबईत एकटीच असायचे. ती रोज माझ्यासाठी सेटवर जेवण घेऊन यायची. खरी आई आपल्याला संस्कार देते. या क्षेत्रातील एथिक्स किशोरी मम्माने मला शिकवले आहेत. त्यामुळे ती माझी आईच आहे. माझी खरी आई अर्चना पाटील आहे. आणि किशू मम्मा ही माझी इंडस्ट्रीमधली आई आहे."
"किशोरी मम्माला सगळे अमिताभ बच्चन म्हणतात. कारण, ती नेहमी वेळेवर सेटवर हजर असते. ही एक मोठी गोष्ट मी तिच्याकडून शिकले. आपण मोठे होत असताना आपल्या मागे एक टीम असते, असं ती मला नेहमी म्हणायची. तुमच्यामागे ५० लोक काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला नेहमी ही जाणीव असायली हवी. कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर असायला हवेत. मी लहान असल्यामुळे तिचं सगळं ऐकलं. हे संस्कार मला तिच्याकडून मिळालं. म्हणून मी तिला खूप मानते," असंही पुढे काजलने सांगितलं.