'भावा-भावांच्या भांडणामध्ये...', प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:29 AM2024-03-04T11:29:48+5:302024-03-04T11:34:29+5:30
मिलिंद गवळी सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (milind gawali). नाटक, मालिका आणि सिनेमा अशा प्रत्येक माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मिलिंद गवळी सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे समाजात वा कलाविश्वात घडणाऱ्या घटनांवर ते भाष्य करतात. काही वेळा त्यांच्या जीवनातील किस्से शेअर करतात. अलिकडेच ते पंजाबमध्ये पोहचले आहेत. तेथून त्यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मिलिंद गवळी यांनी पंजाब राज्यातील संस्कृती आणि महाराष्ट्रात शेत जमिनीवरुन भावा-भावांमध्ये होणाऱ्या भांडणावर भाष्य केलं. मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहलं, ''वाहे गुरु दा खालसा वाय गुरुदी फत्ते' खूप वर्षांनी महाराष्ट्राच्या बाहेर पडलो. खूप वर्षांनी 'आई कुठे काय करते' च्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करतोय. 'आई कुठे काय करते' शूटिंगला दोन दिवसाची सुट्टी होती आणि म्हणून मी आलो पंजाबमध्ये. सकाळी सकाळी चंदीगड एअरपोर्टला उतरलो आणि तिकडनं दोन तास प्रवास करून पटियाला ला पोहोचलो!'
पुढे त्यांनी लिहलं, 'आपलं पंजाबी कल्चर आणि पंजाबी लोक हे खरेच larger-than-life आयुष्य जगत असतात! आणि मी पाहिलं आहे. माझे दोन जुने मित्र बल्लू आणि रवींद्र सुरी, दोघेही कॅम्पस सिरीयलमध्ये माझ्याबरोबर होते. बल्लूच्या लग्नाला मला उशीर झाला म्हणून मी रात्री साडेनऊ दहा वाजता तिथे पोहोचलो बघतो तर त्या हॉलमध्ये कोणीच नव्हतं, मला वाटलं मी उशिरा पोहोचलो, झालं लग्न लागून सगळे घरी निघून गेले, त्या हॉलमध्ये ग्रहस्त होता. त्याला मी विचारलं 'चले गये सब', तर तो उतरला म्हणाला 'अभी शादी शुरू का हुई है रात को 12 बजे के बाद शुरू होगी बल्लू की शादी'. त्या लग्नात इतकी धमाल होती, मी असं खाणं-पिणं नाचणं पाहिलंच नव्हतं कधी'.
पुढे मिलिंद गवळी म्हणाले, 'आज चंदीगड ते पटियाला येत असताना दोन्ही बाजूला इतक्या मोठ्या मोठ्या शेतजमिनी बघून छान वाटलं, नाहीतर आपल्या महाराष्ट्राला “ सख्खा भाऊ पक्का वैरी “चा शाप आहे, भावा भावाच्या भांडणामध्ये प्रत्येकाच्या वाटेला एक दोन चार एकर जमिनी येतात ! दोन दिवस shooting करून, पंजाबी पराठे सराटे खाऊन आपली भाकरी खायला येतो आपल्या महाराष्ट्रात परत'. मिलिंद गवळी यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.