रोजच्या ध्वनी प्रदूषणाला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 12:00 PM2024-01-07T12:00:07+5:302024-01-07T12:07:15+5:30
अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका मुग्धा गोडबोले यांची ध्वनी प्रदूषणासंदर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार अलीकडच्या काळात सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतात. सोशल मीडिया पोस्टद्वारे हे कलाकार आपली मतं चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. सध्या अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका मुग्धा गोडबोले यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांची नुकतीच ध्वनी प्रदूषणासंदर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
मुग्धा गोडबोले यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहले, 'गेले कित्येक दिवस म्हणजे जवळपास 20-25 दिवस आमच्या घराजवळच्या दोन मैदानांवर रोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून मेळा/जत्रा/ जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. 10-10.30 ला संपतात. पण रोज संध्याकाळी 7 ते रात्री 10 जे असतं. तेही त्रासदायकच असतं'.
पुढे त्या म्हणाल्या, 'माईक वरून भसाड्या आवाजात गाणारे, मोठ्याने लावलेले स्पीकर, अगदी सुंदर मराठी गाणी सुद्धा रोज संध्याकाळी एवढ्या मोठ्या आवाजात का ऐकायची? आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी का हे महिना-महिना सहन करायचं? आज कसलीतरी जत्रा, उद्या महोत्सव, परवा कुठलातरी प्रादेशिक बाजार, ह्यांचं संपतच नाही'.
मुग्धा यांनी लिहलं, 'याबद्दल काही बोलायची सोय नाही.कारण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत हे सगळं मोडतं. ह्याच मैदानांवर असंख्य वेळा असंख्य विविध कारणांनी फटाके उडवले जातात. ध्वनी प्रदुषण म्हणजे काय रे भाऊ अशी अवस्था आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक बाहेर जाता. तसं आता यंदा या लादलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या हंगामात इथून बाहेर कुठेतरी जावं का, ह्याचा विचार करावा लागणार'. तसेच मुग्धा यांनी #हैराणजनता #zerosoundsensitivity हे हॅशटॅगही दिले.
ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांनी पुन्हा पोस्ट करत म्हटलं, 'माझ्या पोस्टचा 22 जानेवारीशी काहीही संबंध नाही. मला कोणत्याही प्रकारच्या कर्कश्य ध्वनीचा त्रास होतो. मग तो कोणत्याही निमित्ताने आलेला असला तरी. मी आज हे लिहिलं कारण त्याचा माझ्या कामावर, एकाग्रतेवर आणि मानसिक स्वास्थ्यावर थेट परिणाम होतो आहे, गेले कित्येक दिवस. बाकी ज्यांना त्यातून जे अर्थ काढायचे आहेत. त्यांनी ते खुशाल काढावेत. कीव करण्यापलिकडे मी काहीही करू शकत नाही'.
ध्वनी प्रदूषणाची समस्या काही नवी नाही. हिंदी कलाविश्वातील कलाकारांबरोबरच अनेकदा मराठी कलाकारांनीही ध्वनी प्रदूषणाबाबत सोशल मीडियावरुन भाष्य केलं आहे. मुग्धा यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी 'आई कुठे काय करते', 'अजूनही बरसात आहे', "ठिपक्यांची रांगोळी', ‘श्रीमंत घरची सून’ अशा गाजलेल्या मालिकांसाठी लेखिका म्हणून काम केलं आहे. सोशल मीडियावरही त्या प्रचंड सक्रिय असतात.