"मला वाटलं तुम्ही जय भीम नाही जय शिवराय म्हणाल", अश्विनी महांगडेला चाहतीचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:06 IST2025-04-22T16:06:05+5:302025-04-22T16:06:22+5:30
काही दिवसांपूर्वीच अश्विनीने नागपूरातील दीक्षाभूमीला भेट दिली होती. याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. व्हिडिओ शेअर केल्यानंतर अश्विनीला एका चाहतीचा मेसेज आला. याचा किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

"मला वाटलं तुम्ही जय भीम नाही जय शिवराय म्हणाल", अश्विनी महांगडेला चाहतीचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली...
'आई कुठे काय करते', स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून अभिनेत्री अश्विनी महांगडे प्रसिद्धीझोतात आली. अश्विनीचा चाहता वर्ग मोठा आहे. ती अभिनेत्री असण्याबरोबर राजकारण आणि समाजिक कार्यातही सक्रिय असल्याचं दिसतं. काही दिवसांपूर्वीच अश्विनीने नागपूरातील दीक्षाभूमीला भेट दिली होती. याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. व्हिडिओ शेअर केल्यानंतर अश्विनीला एका चाहतीचा मेसेज आला. याचा किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
अश्विनीने नुकतीच मराठी मनोरंजन विश्वला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "नाही म्हटलं तरी आपण विविध रंगांमध्ये विभागले गेलो आहोत. माझ्यासाठी ही जात वेगळी ती जात वेगळी असं नाही. मी माणूस म्हणून गळ्यांकडे बघते, हे किती जरी सांगायचा प्रयत्न केला तरी पोहोचत नाही. कारण, जेव्हा तुम्ही अश्विनी महांगडेचं प्रोफाइल बघता तेव्हा ती जय शिवराय जय शिवरायच करते. शिवाजी महाराजांचेच विचार फॉलो करते. पण, मी तशी नाहीये, हे मला माहितीये. मी आताच नागपूरला दिक्षाभूमीला गेले होते. मला खूप दिवसांपासून तिथे जायचं होतं. तिथे गेल्यावर मी त्याची पोस्ट केली होती. तिथे वेळ घालवला. तिथे लिहिलेली माहिती वाचली. बरं हेही सांगू इच्छिते की मी संविधान २ वेळा वाचायचा प्रयत्न केला आहे. इतकं ते समजून घ्यायला कठीण आहे".
पुढे ती म्हणाली, "त्या पोस्टनंतर बऱ्याच जणांचे इन्स्टाला जय भीम असे मेसेज आले. मी त्यांना रिप्लाय करताना जय भीम असा रिप्लाय केला. एका ताईंनी मला मेसेज केला की मी आयुष्यात असा कधीच विचार केला नव्हता की या जय भीमचं उत्तर जय भीम असेल. मला असं वाटलेलं की तुम्ही मला उत्तरच देणार नाही. किंवा तुम्ही जय शिवराय असं लिहाल. आज तुमचं जय भीम वाचल्यानंतर मला इतका आनंद होतोय की मी तो शब्दांत मांडू शकत नाही. ही किती छोटी गोष्ट आहे. पण, त्या ताईंनी मला याची जाणीव करून दिली की आपण किती सोपं जगू शकतो".