मुर्खपणाचा कळस, मुलीच्या बापाची लाचारी दाखवणं बंद करा; मालिकेवर रसिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 04:46 PM2021-09-27T16:46:19+5:302021-09-27T16:53:18+5:30
'मन उडू उडू झालं' मालिकेवर रसिकांचा संताप होत आहे. मालिकेच्या कथानक न पटणारे दाखवण्यात आल्याने मालिकेवर चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
'मन उडू उडू झालं' हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेच्या प्रोमोपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार झळकत असल्यामुळे रसिकांनाही मालिकेला पसंती दिली होती. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या मालिकेतील लूकवर प्रेक्षक आणि चाहते अक्षरशः फिदा झाले. हृता या मालिकेत दीपिका देशपांडेची भूमिका निभावतेय.
दीपिका हि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून ती आपल्या बाबांच्या तत्वांना धरून आयुष्यात पुढे जातेय. इतकंच नव्हे तर दीपिका आणि इंद्राची जोडी देखील प्रेक्षकांना अत्यंत भावली आहे. अगदी पहिल्या भागापासूनच रसिकांनी या मालिकेला पसंती दर्शवली होती. मात्र आता याच मालिकेवर रसिकांचा संताप होत आहे. मालिकेच्या कथानक न पटणारे दाखवण्यात आल्याने मालिकेवर चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
टीव्ही मालिका टीआरपी मिळवण्यासाठी तसेच सुरु होताच कमी वेळेत रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक रंजक वाटाव्या अशा गोष्टी करताना दिसतात. मात्र कधी कधी अतिरंजक दाखवण्याच्या नादात रसिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याचे भान विसरल्याचे पाहायला मिळत आहे.'मन उडू उडू झालं' मालिकेतील एका दृश्यावर रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मालिकेचे कथानक रसिकांना खिळवून ठेवणारे असले तरी रसिकांच्या पचनी पडलेले नाही. नुकत्याच झालेल्या भागात दिपूचे वडिल शिक्षक आहेत, असं दाखवण्यात आलं असतानाही लेकीच्या लग्नासाठी हुंडा देताता, तर मुलाकडची मंडळीदेखील वाट्टेल तशा मागण्या करताना दाखवण्यात आले.
मुलीचे वडिल म्हणून त्यांना अपमानास्पद बोलतात. तीन मुलीचं वडिल म्हणून तेही गप्प बसून सगळंकाही ऐकून घेत असतात. मुलांकडच्या मागण्या कशा पूर्ण केल्या जातील यासाठी धडपड करत असतात. या सगळ्या घडामोडी पाहून रसिकांचा चांगलाच संताप झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत चाहते आपला राग व्यक्त करताना दिसत आहे. ''मुलीच्या बापाची लाचारी दाखवणे बंद करा''. ''मुर्खपणाचा कळस'' अशा प्रतिक्रीया सध्या उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.