तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यामुळे चाहते नाराज, म्हणाले - "फक्त तू आहेस..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:24 IST2025-01-10T14:24:17+5:302025-01-10T14:24:53+5:30
Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिकेतून निरोप घेतला आहे. हे समजल्यापासून तिचे चाहते नाराज झाले आहेत आणि ते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यामुळे चाहते नाराज, म्हणाले - "फक्त तू आहेस..."
तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्री घराघरात पोहचली. या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिने साकारलेली मुक्ता रसिकांना खूपच भावली. ती त्यांच्या घरातील जणू सदस्यच बनली. मात्र आता तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिकेतून निरोप घेतला आहे. हे समजल्यापासून तिचे चाहते नाराज झाले आहेत आणि ते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट मालिकेत साकारलेली मुक्ता सुंदर, सालस, अन्यायाविरुद्ध लढणारी आणि आपल्या कुटुंबाला संकंटांतून बाहेर काढताना दिसते. त्यामुळे तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. या भूमिकेतून तिला खूप प्रेम मिळत आहे. मात्र आता तिने ही मालिका सोडल्याचे समोर आले आहे. तिचे चाहते अचानक मालिका सोडल्यामुळे नाराज झाले आहेत. ते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातील काहीचे पोस्ट तेजश्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
इंस्टाग्राम स्टोरीवर तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या पोस्टमधून चाहते तेजश्रीला मुक्ताच्या भूमिकेत मिस करणार असल्याचे सांगत आहेत. एकाने लिहिले की, का. लिहू यार तुझ्याबद्दल? तुझा जान्हवी म्हणून सुरू झालेला प्रवास ते मुक्तापर्यंत फक्त तू आहेस म्हणून मला ते पात्र सुंदर दिसतं अथवा आवडतं. मी तुला मिस करेन. दुसऱ्या युजरने लिहिले की, फक्त तू, तुझ्याशिवाय काहीच नाही. आणखी एकाने लिहिले, या मुक्ताशिवाय प्रेमाची गोष्ट इमॅजिन करू शकत नाही.
प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झालीये. ही अभिनेत्री म्हणजे स्वरदा ठिगळे. तिने शूटिंगलादेखील सुरूवात केलीय. स्वरदाने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केले आहे. आता ती मुक्ताच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.