'फुलाला सुगंध मातीचा' जामखेडकर कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण, कीर्ती झाली IPS
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:45 PM2022-05-27T17:45:08+5:302022-05-27T17:51:01+5:30
‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत कीर्तीचं आयपीएस बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. खडतर प्रशिक्षणाची कसोटी पार करत कीर्तीने आपलं ध्येयं साध्य केलं आहे.
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत कीर्तीचं आयपीएस बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. कीर्तीच्या स्वप्नपूर्तीचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीय. घरच्या जबाबदाऱ्या आणि खडतर प्रशिक्षणाची कसोटी पार करत कीर्तीने आपलं ध्येयं साध्य केलं आहे. जामखेडकर कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
कीर्तीचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. गेले दोन महिने या खास भागासाठी विशेष मेहनत घेण्यात आली. कीर्तीच्या मालिकेतल्या प्रशिक्षणासाठी खऱ्याखुऱ्या एनसीसी कॅडेट टीमची नेमणूक करण्यात आली होती. एनसीसी कॅडेट व्हॅलेण्टाईन फर्नांडिस आणि त्यांच्या टीमने मालिकेतले हे रोमांचक प्रसंग साकारण्यासाठी मेहनत घेतली. कीर्तीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री समृद्धी केळकरने हे आव्हान स्वीकारलं आणि सुरु झाला ध्येयपूर्तीचा प्रवास. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समृद्धीने हे खडतर प्रशिक्षणाचे सीन पूर्ण केले. अर्थात मालिकेत यापुढेही कीर्तीच्या शौर्याचे प्रसंग पाहायला मिळतीलच.
मालिकेतल्या या वळणाबद्दल सांगताना समृद्धी म्हणाली, ‘या मालिकेने मला अभिनेत्री म्हणून समृद्ध केलं आहे. संयम आणि सतर्कता या दोन महत्त्वाच्या गोष्टी मी या निमित्ताने शिकले. मला लहानपणापासूनच खाकी वर्दी विषयी प्रेम आणि आदर आहे. या मालिकेच्या निमित्ताने हे सगळं अनुभवायला मिळत आहे याचा आनंद आहे. याचसाठी केला होता अट्टाहास या तुकाराम महाराजांच्या ओळी मला आठवतात. मालिकेच्या पहिल्या दिवसापासून कीर्तीच्या आयपीएस ऑफिसर बनण्याच्या स्वप्नाचे प्रेक्षक साक्षीदार आहेत. कीर्तीसाठी हे आव्हानात्मक होतंच पण समृद्धी म्हणून माझीही कसोटी लागली. मी फारशी फिटनेस फ्रीक नाही. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतेय. या संपूर्ण प्रवासात महत्वाचा आहे तो स्टॅमिना. स्टॅमिना वाढवण्यासाठी योग्य आहाराकडे आणि व्यायामाकडे मी विशेष लक्ष देतेय. मालिकेत मी बॉडी डबल न वापरता अनेक स्टंट सिक्वेन्स केले आहेत. आयपीएस ऑफिसर बनण्यासाठी जे प्रशिक्षण घ्यावं लागतं ते मालिकेत आम्ही दाखवलं. हे सर्व करत असताना दुखापतही झाली. मात्र खचून न जाता जिद्दीने मी सीन पूर्ण केले. कीर्तीचं आयपीएस बनण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं आहे. आता जबाबदारी दुप्पट वाढली आहे.