राधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:10 AM2018-09-24T11:10:20+5:302018-09-24T11:22:37+5:30
राधा कृष्ण ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. राधा-कृष्ण या मालिकेच्या सेटला नुकतीच मोठी आग लागली आहे.
आकर्षक सेट्स, अॅनिमेशन इफेक्टस आणि कलाकारांचा कसदार अभिनय यामुळे राधा कृष्ण ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही नुकतीच सुरू झालेली मालिका भव्यता, श्रीमंती थाट आणि उच्च निर्मितीमूल्यांसाठी ओळखली जात आहे. या मालिकेचे सेट गुजरातच्या सीमेजवळील उंबरगावमध्ये उभारण्यात आले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या मालिकेची सगळीच टीम ही तिथेच मुक्कामाला आहे. राधा-कृष्ण या मालिकेच्या चित्रीकरणात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी मालिकेची टीम चांगलीच प्रयत्न करत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. राधा-कृष्ण या मालिकेच्या सेटला नुकतीच मोठी आग लागली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे म्हटले जात आहे. या आगीत सेटचे प्रचंड नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. तसेच सुदैवाने या आगीमुळे कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगितले जात आहे. राधा-कृष्ण या मालिकेच्या चित्रीकरणासाठी उमरगांवमध्ये वृंदावनचे दोन सेट लावले होते. या भीषण आगीत हे दोन्ही सेट जळून खाक झाले आहेत. यामुळे निर्मात्यांचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. काही वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार निर्मात्यांनी सेटचा विमा उतरवला होता. पण काही फॉर्मेलिटिजमुळे त्यांना पैसे मिळणे कठीण असल्याची चर्चा आहे.
नेहमीच पौराणिक मालिकेला रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. पौराणिक मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांना प्रचंड आवडत असतात. राधा कृष्ण ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमेध मुदगलकर या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यामुळे सुमेध सध्या खूपच खूश आहे. या मालिकेतील कृष्णाची भूमिका महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी अनेक कलाकारांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. ही एक संगीत मालिका असून त्यात रासलीलेच्या विविध भावना व्यक्त करताना नृत्य आणि संगीताचा वापर केला जाणार आहे.