'अजूनही त्यांची भीती वाटते'; 'त्या' प्रकारानंतर खानजादीच्या मनात निर्माण झाली सलमानची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:17 IST2024-02-28T14:16:47+5:302024-02-28T14:17:19+5:30
Khanzaadi: सलमान खानची पंगा घेतल्यामुळे खानजादीला दुसऱ्याच आठवड्यात बिग बॉसमधून बाहेर पडावं लागलं होतं.

'अजूनही त्यांची भीती वाटते'; 'त्या' प्रकारानंतर खानजादीच्या मनात निर्माण झाली सलमानची दहशत
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहिलेल्या बिग बॉस या शोचं 17 वं पर्व नुकतंच संपलं आहे. मात्र, आजही त्यातील कलाकार सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येतात. यात सध्या फिरोजा खान ऊर्फ खानजादी (khanzaadi) हिची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीमध्ये खानजादीने सलमान खानची (salman khan) भीती वाटते, असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या आहेत.
बिग बॉस 17 मध्ये खानजादीने सहभाग घेतला होता. मात्र,या शोमध्ये तिचं दबंग खान अर्थात सलमान खान याच्याशी कधीच पटलं नाही. बऱ्याचदा सलमान तिची शाळा घ्यायचा. इतकंच नाही तर सलमानसोबत वैर ओढावून घेतल्यामुळे तिला या शोमधून बाहेर पडावं लागलं असंही म्हटलं जातं. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बिग बॉसच्या घरात केलेल्या वर्तनाची जाहीरपणे माफी मागितली आहे. तसंच सलमानची आजही भीती वाटते असा खुलासा केला आहे.
खानदाजीला Ankylosing spondylosis हा आजार असून तिने बिग बॉसच्या घरात वारंवार या आजाराचा उल्लेख केला होता. ज्यामुळे वैतागलेल्या सलमानने सतत या आजाराचं भांडवल करु नकोस असं बजावलं होतं. परंतु, सलमानचा मूळ हेतू समजून घेण्यापूर्वीच खानजादीने त्याला प्रत्युत्तर दिलं. परिणामी, अवघ्या एक आठवड्यात तिला हा शो सोडून जावं लागलं. त्यामुळेच आता तिने जाहीरपणे सलमानची माफी मागितली आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्याकडून झालेल्या चुकीवर भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाली खानजादी?
सलमान खानने मला वेळ दिला आणि बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. पण, त्यावेळी मी इतकी वैतागले होते की मला काहीच समजत नव्हतं. माझ्यात थोडा बालिशपणा आहे. आणि, मला सलमान खानची भीती सुद्धा वाटते. त्यांची एवढी भीती का वाटते माहित नाही. पण, मला वाटते त्यांची भीती, असं खानजादी म्हणाली.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये तिने सलमान खानची माफी मागितली. सोबतच त्याच्यासोबत काम करायची इच्छाही व्यक्त केली. खानजादी बिग बॉसमध्ये फार काळ नाही टिकू शकली. अवघ्या दोन महिन्यांमध्ये ती या शोमधून बाहेर पडली.