इर्शाळवाडीतील लोकांसाठी जुई गडकरी आली धावून, पोस्ट शेअर करत म्हणाली, “औषधे, कपडे...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 14:02 IST2023-07-22T14:01:25+5:302023-07-22T14:02:05+5:30
इर्शाळवाडीतील लोकांसाठी जुई गडकरीची मोठी मदत, पोस्टमधून केलं मदतीचं आवाहन

इर्शाळवाडीतील लोकांसाठी जुई गडकरी आली धावून, पोस्ट शेअर करत म्हणाली, “औषधे, कपडे...”
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. २० जुलैला झालेल्या या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर समाजमाध्यमांवर सगळीकडूनच हळहळ व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणांहून इर्शाळवाडीच्या मदतीला लोक धावून गेले. आता अभिनेत्री जुई गडकरीने इर्शाळवाडीतील लोकांसाठी मदतीचा निर्णय घेतला आहे.
जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने “इर्शाळवाडीसाठी मदत पाठवयाची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इ. जीवनावश्यक वस्तू तिथपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील...”, असं जुईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर जुईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं होतं.
“इर्शाळवाडीशी माझा खूप जवळचा संबंध आहे”, जुई गडकरी भावुक, म्हणाली, “मी गेल्याच वर्षी...”
‘ठरलं तर मग’ मालिकेत काम करणारी जुई गडकरी गेल्याच वर्षी इर्शाळगडावर ट्रेकसाठी गेली होती. तेथील दुर्घटनेनंतर जुईने हळहळ व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इर्शाळगडाच्या आठवणी जुईने सांगितल्या. त्यानंतर आता तिने तेथील लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, इर्शाळवाडीवर अजूनही बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २२ ते २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो, अशी भीती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.