मृणाल दुसानीस आणि शशांक केतकरची फ्रेश जोडी दिसणार 'या' मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:06 PM2018-10-08T14:06:30+5:302018-10-09T06:30:00+5:30
प्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते... म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे.
प्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते... म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे. बऱ्याच जणांना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, पण काहींच्या बाबतीत मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. आयुष्य आणि क्षणाचं नातं हे खूप जवळच आहे. एक क्षण आयुष्याला अर्थ देतो... क्षणात नाती जोडली जातात, क्षणात आयुष्य बहरत, क्षणात जीव जडतो... परीस जसं लोखंडाचं सोनं करतो तसच मनं जुळवणारा हा एक क्षण आयुष्याचं सोनं करतो. हा क्षण माणसाच्या आयुष्यभर लक्षात रहातो. या क्षणामध्ये असीम किमया असते ज्यामुळे आपण क्षणार्धात व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि संपूर्ण आयुष्य बदलून जातं. असचं काहीसं अनु आणि सिध्दार्थच्या बाबतीत देखील आहे. कोणता क्षण अनु आणि सिध्दार्थ एकत्र आणणार ? तो क्षण कधी येणार ? हे बघणं उत्सुकतेचे असणार आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे यांच्या नात्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे. प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती केली आहे मंदार देवस्थळी यांच्या टीमवर्क अलट्रा क्रिएशने. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मध्यमवर्ग कुटुंबामधली अनुश्री ही अत्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे, जिचं आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेमं आहे. अनुश्री सगळ्या घराचा भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन कुटुंबाचा सांभाळ हसतमुखानं करते आहे. “जेव्हा परिस्थिती बदलता येत नाही, तेव्हा मनस्थिती बदलावी” असे अनुचे आयुष्या बद्दलचे मत आहे. दुसऱ्या बाजूला सिध्दार्थ तत्ववादी हा गर्भश्रीमंत आणि उच्चभ्रू घरामधला, कर्तृत्ववान आणि आईवर प्रचंड प्रेम करणारा मुलगा आहे. सिध्दार्थच्या घरामध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे परंतु आजवर त्याला कोणतीच मुलगी आवडलेली नाही. अनु आणि सिध्दार्थचं भावविश्व खूप वेगळं आहे, लग्नाबद्दल या दोघांचही मत वेगळं आहे
आपल्या कमबॅक बद्दल बोलताना मृणाल दुसानीस म्हणाली, “जवळपास एका वर्षांनंतर पुन्हाएकदा या मालिकेद्वारे मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मी खूप खुश आहे... कारण सुध्दा तसचं आहे कलर्स मराठी ही वाहिनी, मंदार देवस्थळी यांचं दिग्दर्शन आणि मधुगंधाचं लिखाण इतकी सुंदर संधी सोडू नये असं मला वाटलं. शशांक आणि माझी जोडी प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. प्रेक्षकांच्या शुभेच्छा मालिकेला आणि आमच्या सगळ्या टिमला असू दे इतकचं सांगेन”.
भूमिकेबद्दल बोलताना शशांक केतकर म्हणाला, “मी खूप खुश आहे कारण पुन्हाएकदा मी कलर्स मराठीवर मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हाएकदा असं मी म्हणालो कारणं माझी पहिली मालिका याच वाहिनीवर होती आणि त्याचा दिग्दर्शक मंदार देवस्थळी होतो. मृणाल दुसानीस ही लोकप्रिय अभिनेत्री आणि वंदना ताई या ज्येष्ठ अभिनेत्री माझ्यासोबत मालिकेमध्ये आहेत याचबरोबर संपूर्ण टीम कमाल आहे. नेहेमीसारखचं प्रेक्षकांचं प्रेम मला मिळेल अशी आशा करतो”.