'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत आदेश बांदेकरांनी धरला ठेका; मुलगा सोहमही थिरकताना दिसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 14:23 IST2024-09-17T14:20:46+5:302024-09-17T14:23:14+5:30
'लालबाग राजा'च्या विसर्जन मिरवणुकीत आदेश बांदेकरांसह त्यांचा मुलगा सोहम देखील थिरकताना दिसत आहे.

'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत आदेश बांदेकरांनी धरला ठेका; मुलगा सोहमही थिरकताना दिसला
Aadesh Bandekar Video : आज मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाला भाविक साश्रूनयांनी निरोप देत आहेत. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज, मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेला 'लालबागच्या राजा'ची मिरवणुक देखील मंडपातून निघाली आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक एकत्र जमले आहेत. अशातच महाराष्ट्राचे लाडके भावजी अर्थात आदेश बांदेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आदेश बांदेकर 'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या सोबतीला मुलगा सोहम देखील आहे.
दरवर्षीप्रमाणे 'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत आदेश बांदेकर आणि त्यांचा मुलगा देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'नवसाला पावणारा, हाकेला धावणारा' अशी 'लालबागच्या राजा'ची ख्याती आहे. त्यामुळे यंदाही लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सगळ्या भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.आदेश बांदेकरांना बाप्पाच्या मिरवणुकीत नाचताना पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान,ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत, गणपती बाप्पा मोरया हा एकच जल्लोष करत गणरायाचे ७ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात आगमन झाले. अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाची १० दिवस सेवा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तगण एकवटले आहेत.