गश्मीर महाजनी सांगतोय प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेत काम करण्याच्या त्याच्या अनुभवाविषयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:22 PM2018-07-17T12:22:29+5:302018-07-17T12:28:19+5:30
प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेत गश्मीर महाजनी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या या नव्या इनिंगबाबत तो चांगलाच उत्सुक आहे.
प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेद्वारे गश्मीर महाजनी छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या मालिकेत काम करायला तो खूपच उत्सुक आहे. त्याच्या या नव्या इनिंगबद्दल तो सांगतो, मला या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची उत्तम संधी मिळालेली आहे. मला अनेक दिवसांपासून माझा देश, माझ्या महाराष्ट्रात जे काही घडतंय, त्याविषयी बोलायचं होतं, मांडायचं होतं. माझे आजोबा एका मोठ्या वृत्तपत्राचे संपादक होते. ते त्यांच्या लेखांतून, अग्रलेखांतून समाजातील चुकीच्या गोष्टी दाखवायचे, समाजाच्या भल्याचा विचार करायचे. मलाही कधीतरी तसं करायचं होतं. प्रेमा तुझा रंग कसा ही मालिका त्यासाठी सर्वोत्तम संधी होती. या माध्यमाचा पुरेपूर वापर मी संवाद साधण्यासाठी करणार आहे. या मालिकेत रोज एक कथा निवडली जाईल आणि नाट्यमय पद्धतीने दाखवली जाईल. आपल्याला नात्यांमध्ये खूप गोष्टी खटकतात, मग ते पत्नीसह असो, आईसह असो... आपण ते स्वीकारायला तयार नसतो. वरवर पाहता ते प्रश्न म्हणून वाटतही नाहीत. ते खूप छोटे प्रश्न वाटत असल्याने आपण त्याविषयी संवाद साधायला सुरुवात नाही केली. नेमकं काय चुकतंय, आपण एकमेकांपासून इतके का दुरावलोय, सोशल मीडियाद्वारे आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जवळ आलोय, पण प्रत्यक्षात एकमेकांशी बोलत नाही, संवाद साधत नाही. या सगळ्याविषयी मालिकेत आपण बोलणार आहोत. मात्र हे करताना कुठेही ज्ञानाचा डोस देण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. अभिनेता म्हणूनही या विषयी माझ्या मनात असलेली खदखद या कार्यक्रमातून मोकळी करणार आहे. मला काम करताना क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं. प्रत्येक काम अपेक्षित परफेक्शननं झालं नाही की, मला त्याचा त्रास होतो. दिवसाचे पैसे मिळाले ना, चलता है यार अशा पद्धतीने मी काम करूच शकत नाही. माझी काही ठाम मतं आहे. माझ्या विचारांशी साम्य असलेली मंडळी स्टार प्रवाहमध्ये आहेत. श्रावणी देवधर आणि सगळीच क्रिएटिव्ह टीम यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकलाय, मला क्रिएटिव्ह फ्रिडम दिलाय, त्यामुळे मला काम करायला खूप मजा येतेय. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवं असतं? त्यामुळे मी खूप खूश आहे.