'गाडी घेतली पण बाबाच नव्हते', फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने सांगितला भावूक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 10:16 AM2024-05-07T10:16:10+5:302024-05-07T10:18:11+5:30
सर्वांना खळखळून हसवणाऱ्या गौरवने सांगितला भावूक किस्सा
'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून लोकप्रियता मिळवलेला गौरव मोरे (Gaurav More) सध्या हिंदी कॉमेडी शो गाजवतोय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून गौरवचं टॅलेंट जगासमोर आलं. त्याची दखल सर्वांनीच घेतली आणि आज तो 'मॅडनेस मचाएंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्ये सर्वांना खळखळून हसवत आहे. मात्र गौरवने एक भावूक करणारा किस्सा सांगत अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलंय. काय आहे तो किस्सा वाचा.
'मॅडनेस मचाएंगे'च्या एका एपिसोडमध्ये गौरव मोरेने पहिल्यांदा गाडी खरेदी केली त्याची आठवण सांगितली. तो म्हणाला, "बाहेर फिरायला जायचं म्हणलं की मला नेहमी वाटायचं की अरे आपल्याकडे गाडी असायला हवी होती. बस, ट्रेनने तर मला प्रवास करायचा आवडतोच. मी आतासुद्धा करु शकतो. पण माझे वडील म्हणायचे घराच एक चारचाकी पाहिजे. तेव्हाच मी ठरवलं की सेकंड हँड का असेना आपण चारचाकी घ्यायची. ज्याच्या घरासमोर कार पार्क असते तो मोठा माणूस असंच लोकांना वाटतं. एका शोमध्ये मी काम करत होतो तिथे झालेल्या कमाईतून मी कार घ्यायचं ठरवलं. मी गाडी घ्यायला गेलो तेव्हा समोरचा माणूस म्हणाला दीड लाखात देईन. माझ्याकडे फक्त १ लाख १० हजार होते. मी त्याला पैसे कमी कर म्हणलं. पण तो ऐकत नव्हता. मी शेवटी माझ्या आईला सोबत घेऊन गेलो. मला वाटलं तिचं ऐकून तरी तो कमी करेल. त्याला म्हणलं काहीही करुन मला ही गाडी हवी आहे."
अखेर गाडी घेतली पण हा आनंद पाहण्यासाठी बाबाच नव्हते. 2015 मध्ये ते गेले. गाडी उशिरा घेतली. आज बाबा सोडून सगळेच कारमध्ये बसतात तेव्हा वाईट वाटतं. नव्या गोष्टी आपण विकत घेतो, पण ज्यांच्यासाठी घेतो ते लोक आपल्याबरोबर असले तर पाहिजेत. पण बाबांचा फोटो घेऊन चला एकत्र फिरायला असं म्हणत मी स्वत:चंच समाधान करुन घेतो. आज त्यांच्याच आशीर्वादामुळे माझ्याकडे सगळं काही आहे."