‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’मध्ये गौतम गुलाटी दिसणार या भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 04:16 PM2018-08-30T16:16:15+5:302018-08-30T16:16:42+5:30
‘कर्णसंगिनी’ या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणावर केली जाणार असून त्यातून त्या काळातील भव्यता दिसून येणार आहे. तसेच एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
महाभारताच्या पार्श्वभूमीवर एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहेत. या कलाकारांच्या यादीमध्ये आता गौतम गुलाटी या अभिनेत्याचा समावेश झाला आहे. कहानी हमारे महाभारत की, कसम से, तुझ संग प्रीत लगाई सजना, दिया और बाती हम या मालिकांमध्ये तर बिग बॉस, नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकला आहे. अझर या चित्रपटात तो रवी शास्त्री यांच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने बहन होगी तेरी या चित्रपटात काम केले आहे. आता तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘स्टार प्लस’वरील महाभारताच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत कर्ण आणि त्याची पत्नी उरुवी यांची अज्ञात कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महाभारतातील राजकारण आणि युद्ध या प्रमुख कथेची माहिती सर्वांना असली, तरी या मालिकेत कर्णाच्या प्रेमकथेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
‘कर्णसंगिनी’ या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणावर केली जाणार असून त्यातून त्या काळातील भव्यता दिसून येणार आहे. तसेच एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, हीसुध्दा या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. आपल्या देखणेपणामुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता गौतम गुलाटी हा या मालिकेत महत्त्वाची भूमिका रंगवणार आहे. या भूमिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. त्याचे हवेहवेसे व्यक्तिमत्त्व, सहज वावर आणि देखणेपणामुळे तो दुर्योधनाच्या भूमिकेसाठी सुयोग्य असल्याचे मानले जात आहे.
‘कर्णसंगिनी’ मालिकेसाठी गौतमकडे दुर्योधनाच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली असली, तरी त्याने यापूर्वी देखील कहानी हमारे महाभारत की या मालिकेत ही व्यक्तिरेखा साकारलेली होती. गौतमने महाभारताचे विविध अंगांनी वाचन केले असून त्यातील दुर्योधनाच्या भूमिकेचा विशेष अभ्यास केला आहे. त्याचे या व्यक्तिरेखेबद्दलचे ज्ञान लक्षात घेऊनच त्याची दुर्योधनाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
‘कर्णसंगिनी’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्लस’वर सुरू होणार आहे.